गोवा म्हणजे गोवा! दोस्तांसोबत कितीतरी प्लॅन्स करून शेवटी जायचं राहतंच तो प्रदेश म्हणजे गोवा! कोकणसारखाच पण थोड्या वेनावगळ्या हिरवळीने नटलेला निसर्गसमृध्द प्रदेश म्हणजे गोवा. या गोव्याच्या भूमीत बा.भ.बोरकरांच्या कवितांसोबतच अनेकांच्या अनेक प्रकारच्या कथा फुलल्या. काही तिथेच राहिल्या तर काहींच्या पुढे गेल्या आणि आपटल्या.

पण काहीही असो. ‘गोवा’ हे फक्त एक नाव नाहीये तर ते एक फीलिंग आहे. समुद्र नसलेल्या शहरांमधले पर्यटक तर इथे येतातच पण मुंबईसारख्या समुद्रकिनारे आहेत म्हणवल्या जाणाऱ्या शहरांमधले लोकसुध्दा धूर नाहीतर दुसऱ्या लोकांचा श्वास नसलेल्या हवेत श्वास घ्यायला गोव्यामध्ये येतात.

गोव्यात तुमच्या पसंतीप्रमाणे चिल करायचे अनेक आॅप्शन्स आहेत. तुम्हाला पार्टी आवडत असेल किंवा शांतपणे निसर्गाचा आस्वाद घेण्याचे तुमचे प्लॅन्स असतील. गोव्यात सगळे पर्याय आहेत.

आता अशा या गोव्यात राजकारणी पण कूल असतात. एरवी मुख्यमंत्री म्हटलं की सुटणारं पोट लपवायला कुर्ता घालणारा माणूस समोर येतो. नाही म्हणायला पोस्टरवर किंवा जाहिरातींमध्ये माननीय नामदार साहेबांचे फोटो रिटच करत लावले जातात. पण सोशल मीडियावर आपला हटके आणि मस्त फोटो टाकण्यासाठी गोव्याचाच मुख्यमंत्री हवा. तर सामान्य मर्त्य लोकहो, सादर आहेत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर !

गोव्याच्या विधानसभा निवडणुका ४ फेब्रुवारीलाच पार पडल्या आहेत. त्या सगळ्या धामधुमीतून मोकळं झाल्यावर एका स्वीमिंग पूलमध्ये रिलॅक्स करणारा आपला फोटो पार्सेकरांनी आपल्या सोशल मीडीया अकाऊंटवर टाकलाय.

राजकारणाचे विषय बाजूला टाकले आणि हा फोटो पाहिला की लक्षात येतं की हा खरंच चांगला फोटो आहे. कॅमेरा अँगल, कंपोझिशन आणि हा फोटो जिथे घेतलाय ती जागा खूपच छान वाटतेय. या फोटोकडे पाहिल्यावर खरोखर रिलॅक्सिंग वाईब्स येतात. राजकारण्यांच्या एकाच अॅंगलमधल्या ठराविक छापाच्या फोटोंपेक्षा हा फोटो खूपच वेगळा आहे.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फोटो स्वत: सोशल मीडियावर टाकण्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय. मुख्यमंत्री तर सोडाच, किती राजकीय नेते आपला असा फोटो इंटरनेटवर टाकायला धजावतील? असा फोटो नेटवर टाकण्यापूर्वी मग लोकं काय म्हणतील आणि नेटवर काय कमेंट्स येतील, पुढे या फोटोचा कसा वापर होईल वगैरे कॅलक्युलेशन्समध्ये बहुतेक राजकीय नेते या फंदात पडणारच नाहीत.

म्हटलं ना असा चिल मूडमधला फोटो टाकायला गोव्याचा मुख्यमंत्रीच हवा!