काॅर्पोरेट जगतातले वारे विचित्र असतात. एका क्षणी काहीतरी एक घडत असतं आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या अगदी विरूध्द घडतं. आपल्याशी अतिशय प्रेमाने वागणारे कंपनीतले आपले सहकारी आणि कंपनी व्यवस्थापन एकाएकी आपल्याशी कमालीच्या शत्रुत्वाने वागतं.

गूगलमध्येही तसंच झालंय. गूगलच्या ‘ड्रायव्हरलेस कार’ प्रोजेक्टचा ‘चमकता सितारा’ अँथनी लेवांडोवस्कीवर आता गूगलने कोट्यवधी डाॅलर्सचा खटला भरलाय. गूगलमधली अतिशय महत्त्वाची तंत्रज्ञानविषयक माहिती चोरल्याचा आरोप ठेवत  बौध्दिक संपदा कायद्याखाली अँथनीवर हा खटला भरण्यात आलेला आहे. अँथनी आता ‘उबर’ कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करतो आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असलेली ‘उबर’ कंपनीसुध्दा ड्रायव्हरविरहित गाडी तयार करण्याच्या स्पर्धेमध्ये आहे.

इंजिनिअर्ससाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया बर्कली’ मध्ये इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण घेतलेल्या अँथनीला गूगलच्या ‘ड्रायव्हरविरहित कार’च्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाचं स्थान होतं. ‘गूगल’ सोडून ‘उबर’ जाॅईन करताना शेवटच्या काही दिवसात त्याने गूगलच्या सर्व्हरमधून सुमारे १४ हजार फाईल्स चोरल्या असं गूगलने म्हटलंय.

ओल्या मातीवरून जर आपण चालत गेलो तर आपल्या पायांचे ठसे त्यात उमटून आपण पुढे गेल्यानंतरही एखाद्याला आपण तिथे होतो हे कळू शकतं. त्याचप्रमाणे एखाद्या काँप्युटर सिस्टिममध्ये आपण जर काही करत असलो तर त्याचे ‘डिजिटल फूटप्रिंट्स’ त्या सिस्टिममध्ये तयार होतात. आणि त्याचा मागोवा घेत आपण त्या सिस्टिममध्ये नक्की काय केलं आहे याचा मागोवा काँप्युटरतज्ञांना घेता येतो.

VIDEO: मिस्टर प्रेसिडेंट, सांगा माझ्या पतीचा अमेरिकेत खून का झाला?

अँथनीने गूगलमध्ये नोकरी करण्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये गूगलच्या सिस्टिममध्ये केलेल्या हालचालींचे असे डिजिटल फूटप्रिंट्स आपल्याला सापडले असल्याचं ‘गूगल’ने म्हटलंय. स्वत: एक बुध्दिमान इंजिनिअर असलेल्या अँथनीने या डिजिटल फूटप्रिंट्स नष्टही केल्या. पण त्याने हे केलेले प्रयत्न आपल्याला सापडले असल्याचं गूगलने म्हटलंय आणि या डिजिटल फूटप्रिंट्स नष्ट करण्याचा अँथनीकडून करण्यात आलेला प्रयत्नच त्याच्या मनातली भीती दर्शवतो असं गूगलने म्हटलंय. अँथनीने या सगळ्या आरोपांचा इन्कार केला आहे.

अर्थात तंत्रज्ञानविषयक असणारं हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं आहे यात शंका नाही. पण अँथनी लेवांडोवस्कीच्या उदाहरणातून काॅर्पोरेट जगतातल्या अचानक घडणाऱ्या विचित्र घटनांचा अंदाज येतो.