दीर्घकाळ राजगादीवर असलेली ब्रिटिश राजघराण्यातली पहिली व्यक्ती म्हणजे ब्रिटनची राणी एलिझाबेथ. जिच्या राज्याचा सूर्य कधीच मावळत नाही, अशा सामान्य जनतेला आपल्याशा वाटणाऱ्या या राणीने नव्वदी ओलांडली आहे. ब्रिटनमधल्याच लोकांना काय पण जगातल्या अनेकांना या राणीबद्दल जाणून घेण्याची, तिला जवळून पाहण्याची उत्सुकता असते. फार कमी लोकांना ही संधी मिळते.

पण ज्या कोण्या महत्त्वाच्या व्यक्तींना राणीला भेटण्याची संधी मिळते त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे नियम असतात आणि ते नियम पाळणं प्रत्येकाला बंधनकारक आहे. ब्रिटनच्या राजघराण्याचे काही राजशिष्टाचार आहेत त्यानुसार सामान्य व्यक्तीला राणीला स्पर्श करण्याची अनुमती नाही. पण कॅनडाच्या गव्हर्नर जनरलनी मात्र हे शिष्टाचार मोडले तेव्हा ब्रिटनच्या अनेक माध्यमांत हा विषय चर्चेचा विषय बनला. कॅनडाच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त राणीने लंडनमधल्या कॅनडा हाऊसला भेट दिली. यावेळी पायऱ्या उतरताना गव्हर्नर जनरल डेव्हिड यांनी राणीच्या दंडाला पकडून त्यांना खाली उतरवण्यास मदत केली. तेव्हा राणीसह अनेकांना थोडं अवघडल्यासारखं झालं. ब्रिटनच्या राजघराण्याच्या शिष्टाचारानुसार सामान्य व्यक्ती राणीला स्पर्श करू शकत नाही. तेव्हा डेव्हिड यांचं हे कृत्य माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

वाचा : आईसाठी गेल्या २० वर्षांपासून ‘तो’ मुलगी होऊन जगतोय

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी वावरताना राणी सोबत पर्सही ठेवते. काही दिवसांपूर्वी एक इतिहासकाराने यामागचं गुपित उघड केलं होतं. आपल्या सहकाऱ्यांना सिक्रेट साईन्स देण्यासाठी त्या आपल्यासोबत पर्स ठेवतात. आपले संभाषण आवरतं घ्यायचं आहे किंवा तिला पुढच्या काही मिनिटांत त्या ठिकाणावरून निघायचे आहे असे अनेक इशारे आपल्या सहकाऱ्यांना देण्यासाठी राणी पर्सचा वापर करते.