एक जुलैपासून देशभरात लागू होणाऱ्या जीएसटीमुळे विक्रेत्यांनी आपल्याकडील माल विक्रीसाठी काढला आहे. जीएसटी या करप्रणालीमुळे वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. एक जुलैसाठी केवळ २ दिवस बाकी असताना मॉल तसेच ऑनलाईन कंपन्यांनीही आपल्या वस्तू विक्रीसाठी काढल्या आहेत. यामध्ये बिगबाजार बरोबरच अॅमेझॉनसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. सर्वच ठिकाणी अशाप्रकारे ऑफर्स जाहीर करण्यात आल्याने ग्राहकांच्यादृष्टीनेही ते फायद्याचेच आहे.

या ऑफरमध्ये कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, किराणा आणि इतर घरगुती सामान यांचा समावेश आहे. बिग बाजारमध्ये ३० जूनच्या रात्रीपासून हा सेल सुरु करण्यात येणार असल्याचे फ्युचर ग्रुपकडून सांगण्यात आले. तर फ्लिपकार्ट या ऑनलाइन पोर्टलने बुधवारपासूनच आपला सेल चालू केला आहे. फ्लिपकार्टशी स्पर्धा असलेल्या अॅमेझॉन कंपनीने इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ४० ते ५० टक्के इतकी सूट दिली आहे. मात्र अशी ऑफर दिलेली असतानाही ही ऑफर जीएसटीमुळे देण्यात आलेली नाही असे कंपनीने म्हटले आहे.

जवळपास ४० ते ५० टक्के फरकाने एखादी वस्तू मिळत असेल तर ते ग्राहकांसाठी अर्थात फायद्याचेच आहे. त्यामुळे खरेदी करण्यासाठी हा सर्वोत्तम सिझन आहे. कपडे, चपला, दागिने यांच्यावरही मोठी सूट मिळत आहे. मागील एका महिन्यात पेटीएम वापरकर्त्यांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे. यातील अनेक ऑफर्स ३० जूनला संपणार आहेत. तर काही १ जुलैपासून सुरु होत आहेत. त्यामुळे जीएसटीच्या निर्णयामुळे सध्या ग्राहकांना काही प्रमाणात तरी फायदा होणार हे निश्चित.