गेल्या ६५८ दिवसांपासून ‘कटप्पाने बाहुबली को क्यो मारा?’ या एकाच प्रश्नाने आपलं जाम डोक खाल्लं बुवा. पार डोक्याचा भुगा झालाय आता. पण उत्तर काही मिळालं नाही. भल्याभल्याने काय सॉलिड डोकं लढवलं प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी पण त्यांनांही काही जमलं नाही. आता उद्या मात्र तमाम देशवासीयांना दोन वर्षांपासून ‘छळणाऱ्या’ या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. पण प्रॉब्लेम असा आहे ना की बाहुबली २ बघायला जायचं तरी कसं? सगळ्यांनाच उत्तर जाणून घ्यायचं आहे तेव्हा याची तिकिट मिळवण्यासाठी नुसती मारामारी सुरू आहे. हैदराबादमध्ये तर लोकांनी तिकिटीसाठी तीन तीन किलोमीटर रांगाही लावल्यात म्हणे. नशिबवान माणसांना तिकिट मिळालीत पण आता वेगळीच अडचण समोर आलीय ती म्हणजे ऑफिसची.

हाफ डे टाकून सिनेमा बघायला जायचा की सरळ सुट्टी घायची असा संभ्रम या सिनेमावेड्यांना पडलाय. बरं हाफ डेने गेलं आणि मध्येच काम आलं तर? हा यांचा प्रॉब्लेम आणि रजा टाकायची झाली तर रजेचं कारण काय देणार ? हा दुसरा प्रॉब्लेम. तेव्हा सोशल मीडियावर बाहुबली २ या आजाराने ग्रासलेल्या लोकांसाठी एकापेक्षा एक रामबाण उपाय नेटिझन्स शोधून काढलेत. बाहुबली २ बघायचा म्हणजे अनेकांनी सुट्टी टाकली असणार किंवा काही जण सुट्टी टाकायच्या विचारात तरी असणार तेव्हा सुट्टी टाकताना रजेच्या अर्जात ते काय लिहू शकतात याच्या एकापेक्षा एक भन्नाट कल्पना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. एवढंच कशाला अनेकांनी तर रजेचा अर्ज देखील बनवून त्याची कॉपी व्हायरल केली आहे. आता या रजेच्या अर्जात काय कारणं लिहिली असतील हे वेगळं सांगायला नको. पण ज्याने कोणी ही कारणे शोधून काढली आहेत त्यांच्या ‘क्रिएटिव्ह’ डोक्याचेही कौतुक करायला हवे नाही का?