आपल्या सोबत आपले समर्थक कायम असावेत, त्यांचे समर्थन आपल्याला नेहमी मिळत राहावे, असे राजकारण करणाऱ्या प्रत्येकालाच वाटत असते. मात्र एका कार्यक्रमात अमेरिकन अध्यक्षपदाच्या डेमोक्रॅट पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्याकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे हिलरी यांच्या टिममधील एका व्यक्तीनेच लोकांनी हिलरींकडे पाठ केलेले छायाचित्र शेअर केले आहे. हिलरींना पाहायला जमलेल्या सर्वांनी हिलरी त्यांच्या सेल्फीत दिसाव्यात, म्हणून त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे या छायाचित्रात उपस्थित असलेले सर्वजण हिलरींकडे पाठ करून उभे असल्याचे दिसत आहेत.

तंत्रज्ञानासोबत लोकांच्या सवयीदेखील बदलतात. हिलरी यांच्या या छायाचित्रात तेच दिसून येते आहे. आधी प्रसिद्ध व्यक्तींना पाहताच लोक त्यांच्याकडे स्वाक्षरी मागायचे. मात्र आता लोक प्रसिद्ध व्यक्तींसोबत सेल्फी घेतात. यासाठी जरी त्यांना त्या व्यक्तीकडे पाठ फिरवावी लागली, तरी त्यांना त्याची चिंता नसते. हिलरी यांच्या या छायाचित्रात हेच पाहायला मिळते आहे. हिलरी यांच्या टिममधील व्हिक्टरने हे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. हिलरी यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान हे छायाचित्र टिपण्यात आले आहे. या छायाचित्रात हिलरी पोडियमवर उभ्या राहून सर्वांना अभिवादन करत आहेत. तर उपस्थित लोक हिलरींसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

हिलरींसमोर उभ्या असलेल्या प्रत्येकाला हिलरींसोबत सेल्फी काढायचा आहे. त्यांचा हा प्रयत्न छायाचित्रात स्पष्ट दिसतो आहे. आधुनिक काळातील माणसाच्या बदलेल्या सवयी दाखवणारे हे छायाचित्र आतापर्यंत २२ हजारहून अधिक वेळा रिट्विट झाले आहे, तर या छायाचित्राला २५ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

हिलरी यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. यामध्ये हिलरी स्वत: उपस्थितांना सेल्फी काढण्याचे आवाहन करत आहेत. अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या डिबेटच्या पहिल्या फेरीत हिलरी क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प यांना वरचढ ठरल्या आहेत. ९० मिनिटे चाललेलया या डिबेटमध्ये हिलरी यांना ६२% लोकांनी पसंतीची पावती दिली. तर डोनाल्ड ट्रम्प यांना २७% मते मिळाली.