आई होऊन सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे, हे आताच्या स्पर्धेच्या युगात फारसे सोपे राहिलेले नाही. काम आणि घर सांभाळताना होणारी तारेवरची कसरत कोट्यवधी महिलांना करावी लागते. मात्र तरीही महिला घर आणि काम या दोन्ही गोष्टी गोष्टींचा समतोल राखतात. कार्यालयातील कामाची जबाबदारी पार पडताना घरातील कर्तव्ये महिला अगदी लिलया पार पाडतात. अशाच एक आईचे सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे.
कान्ससमधील सब्रिना फायफर काही दिवसांपूर्वीच आई झाली. सब्रिनाने एका गोड मुलीला जन्म दिला. आईस हॉकीपटू असलेल्या सब्रिनाच्या कारकिर्दीला मातृत्त्वामुळे ब्रेक लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र हॉकीची आवड आणि आई झाल्यानंतर खांद्यावर आलेली कर्तव्याची कावड या दोन्हींचा समतोल सब्रिना साधते आहे. हॉकीचा सामना सुरू होण्यापूर्वी इतर खेळाडू वॉर्म अप करत असताना सब्रिना तिच्या मुलीला दूध पाजते. चिमुरडीला दूध पाजून झाल्यावरच सब्रिना मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजण्यासाठी उतरते.
सब्रिनाने तिचा सामना सुरू होण्याआधीचे एक छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. ‘सामना सुरू होण्याआधी करावी लागणारी तयारी आता बदलली आहे’, या शब्दांमध्ये सब्रिनाने तिची भावना व्यक्त केली आहे. सब्रिना शाळेत असल्यापासूनच हॉकी खेळते आहे. त्यामुळेच मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या ३ आठवड्यांमध्ये सब्रिना आईस रिंकवर परतली.
करिअर आणि आई होण्याची जबाबदारी सब्रिना एकाचवेळी पार पाडते आहे. सब्रिनाने याचे श्रेय तिच्या पतीला दिले आहे. ‘पतीने केलेले सहकार्य आणि त्याने दिलेली भक्कम साथ यामुळेच मी आई झाल्यावर लगेचच आईस हॉकीकडे परतू शकले,’ अशा शब्दांमध्ये सब्रिनाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.