जगभरात सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्याची सुरक्षा याबाबत मोठी चर्चा होताना दिसते. सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी अव्वल असणाऱ्या ट्विटवर या मायक्रोब्लॉगिंग साइटने आपल्या यूजरचे अकाऊंट खरे आहे हे दर्शविण्यासाठी ब्लू टिकचा पर्याय सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता ही ब्लू टिक नेमकी कोण वापरु शकतो. ती मिळवायची असेल तर नेमके काय करायचे असे प्रश्न आपल्याला पडले असतील तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरु शकेल. राजकारणी, प्रसिद्ध अभिनेते, खेळाडू यांच्या नावाने फेक अकाऊंट तयार करुन त्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी ही सुविधा ट्विटरने सुरु केली. त्यामुळे तुम्ही ट्विटर वापरत असाल तर अनेकांच्या अकाऊंटवर तुम्हाला ही ब्लू रंगाची टिक दिसू शकेल.

ट्विटरने सुरु केलेल्या नवीन सोयीमध्ये युझरला एक फॉर्म भरावा लागणार आहे. त्यानंतर ट्विटरने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. तुमचे ट्विटर अकाऊण्ट का व्हेरिफाय करावे, हा त्यातील महत्वाचा प्रश्न असेल. त्यानंतर ट्विटर मेलद्वारे या विनंतीवर त्यांनी काय निर्णय घेतला हे अर्ज करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला कळवेल. अर्ज नाकारण्यात आल्यास तीस दिवसानंतर पुन्हा नव्याने अर्ज करता येणार आहे. एखाद्या व्यक्तीचा त्याच्या क्षेत्रात जास्त प्रभाव असेल आणि त्याच्या व्हेरिफिकेशनने इतर युजर्सला फायदा होणार असेल तर संबंधित व्यक्तीला ट्विटरकडून ती टिक देऊन त्याचे अकाऊंट व्हेरिफाईड असल्याचे स्पष्ट केले जाते. मात्र, सामान्य युजरलाही या टिकसाठी अर्ज करता येणार आहे.

ट्विटरवर सध्या ३२ कोटींहून अधिक युजर्स आहेत. यामध्ये राजकारण, मनोरंजन, उद्योग, खेळ, प्रसारमाध्यमे यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच संस्थांचाही समावेश आहे. ट्विटरवरून प्रभावशाली व्यक्तींना आणि खरी माहिती देणाऱ्यांना सहज शोधता यावे यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. ट्विटवरून जास्तीत जास्त चांगली माहिती आणि व्यक्तींशी कनेक्ट होण्याचा मार्ग सुकर होतो. जास्तीत जास्त ट्विटवर अकाऊण्ट व्हेरिफाय झाल्यास ट्विटरवरून होणारी फसवणूक आणि बुलिंगसारख्या प्रकारांना थोड्याफार प्रमाणात आळा घातला येईल.

तुमचे अकाऊंट व्हेरिफाय कसे कराल?

व्हेरिफायइड फोन नंबर, ई-मेल आयडी, स्वत:बद्दलची महत्त्वाची माहिती, प्रोफाइल फोटो, जन्म तारीख, आणि ट्विटर सेटिंगमध्ये ट्विट फॉर पब्लिक (लोकांना तुमचे ट्विट दिसायला हवेत तो पर्याय निवडलेला) या गोष्टी असणे आवश्यक आहे. ही माहिती एका फॉर्ममध्ये भरून तो सबमिट केल्यावर तुम्हाला तुमचे अकाऊण्ट का व्हेरिफाय करणे गरजेचे आहे हा महत्वाचा प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर अन्य काही प्रश्नांना उत्तर दिल्यानंतर गरज भासल्यास ट्विटर तुमच्याकडे सरकारने दिलेल्या ओळखपत्राची कॉपी मागू शकते. अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला मेल द्वारे अर्जावर काय निर्णय झाला कळवण्यात येईल. अर्ज बाद करण्यात आल्यास ३० दिवसांनी परत अर्ज करता येणे शक्य होणार आहे. ट्विटर अकाऊण्ट लॉगइन करून https://verification.twitter.com/request या लिंकवरून व्हेरिफिकेशनसाठीचा अर्ज भरता येईल.