केशकर्तनालयात आतापर्यंत कात्रीने केस कापलेले तुम्ही पाहिले असेल पण कर्नाटकमधल्या शहाबाद गावात असा हेअर स्टाईलिस्ट आहे जो जळत्या मेणबत्तीने ग्राहकांचे केस कापतो. गुलबर्गमधल्या शहाबात गावात ‘दशरथ ऑफ राज मेन्स पार्लर’ आहे जिथे दशरथ नावाचा हेअरस्टाईलिस्ट हातात मेणबत्ती घेऊन ग्राहकांचे केस कापतो. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दशरथ ग्राहकांचे अशाच पद्धतीने केस कापत आहे. ‘कात्री घेऊन केस सगळेच कापतात पण मला वेगळ्या पद्धतीने केस कापायचे होते म्हणूनच मी मेणबत्ती वापरून केस कापायचे ठरवले’ असेही त्याने ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

‘वेगळे काहीतरी दिले की ग्राहक नेहमीच आकर्षित होतात, मलाही ग्राहकांना नवीन काहीतरी द्यायचे होते. इथे नेहमी वीज जायची. वीज गेली की आम्ही मेणबत्त्या पेटवून काम करायचो. एकेदिवशी आपण मेणबत्ती वापरून का नाही केस कापायचे अशी कल्पना मनात आली. लगेच नेहमीच्या ग्राहकावर हा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी देखील झाला’ असेही दशरथने सांगितले. दशरथच्या अजब गजब केस कापण्याच्या पद्धतीमुळे रोज नवनवे ग्राहक त्याच्याकडे येतात. त्याच्या या अनोख्या स्टाईलची चर्चा सध्या सगळीकडेच आहे.