The ICC Champions Trophy 2017 मध्ये भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. खरं तर समोर दुसरा एखादा संघ असता तर ही हार चाहत्यांनी पचवली असती. पण समोर होता तो भारताचा जूना शत्रू. अन् शत्रूकडून दारूण पराभव होण्याचं दु:ख काय असतं हे कदाचित शब्दात मांडता येणंही अवघडच आहे. आतापर्यंत सर्वोत्तम संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघावर पाकिस्तानने १८० धावांनी विजय मिळवला. भारतीय संघ जेमतेम १५८ धावांपर्यंत पोहोचू शकला. पाकिस्तान संघाने उभारलेल्या ३३९ धावांचं आव्हान रोहित, विराट, युवराज, धोनी, शिखर कोणालाच पूर्ण करता आलं नाही. खरं तर पाकिस्तान संघांचा बलाढ्य भारतीय संघापुढे निभाव लागणार नाही असंच सगळ्यांना वाटत होतं, पण अतीआत्मविश्वास नडला.

भारत पाकिस्तान सामना म्हटलं की हाय व्होल्टेज सामना असतो. ‘मौका मौका’ म्हणत पाकिस्तान संघाला नेटिझन्सनं चांगलंच डिवचलं होतं, पण शत्रूला कधीही कमी लेखू नये हे दाखवत या संघाने आपल्या साऱ्या अपमानाचा पुरेपुर सूड उगवला. आता कोट्यवधी क्रिकेट प्रेमींच्या स्वप्न धुळीला मिळाल्यावर अनेकांना राग अनावर झाला होता, पण तरीही भारतीय चाहते आपल्या संघाच्या पाठी खंबीरपणे उभे राहताना दिसून येत आहे. हे अपयश पचवणं नक्कीच कठीण असलं तरी भारतीय चाहत्यांनी देखील यावेळी कमालीचा संयम दाखवला. शेवटी खेळ हा खेळ असतो आणि खेळ म्हटलं की जय पराजय होतंच असतो. तेव्हा एका अपयशाने थोडीच फरक पडणार आहे.. तेव्हा आपल्या संघाला ट्विटरवर ट्रोल न करता त्यांच्या मेहनतीचा आदर करून त्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन चाहत्यांनी केलं आहे. इतकंच नाही तर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटीनीं देखील भारतीय संघाला ट्विट करत आपला पाठिंबा दर्शवला आहे.