The ICC Champions Trophy 2017 मध्ये भारतीय संघाचा १८० धावांनी दारूण पराभव झाला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३३९ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना आघाडीच्या फळीने भारतीय चाहत्यांना निराश केले. रोहित, विराट, युवराज, महेंद्रसिंग धोनी, शिखर यांच्याकडून खूपच आशा होत्या पण सामना सुरू झाल्यानंतर काहीच क्षणात सगळं संपलं. Champions Trophy मधून भारतीय संघ बाहेर जाणर हे चित्र आता साफ दिसत होतं. त्यानंतर आलेल्या कोणत्याचा खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर भारतीय संघ मोठ्या संकटात सापडला होता, पण भारतीय संघाची बुडालेली नाव तारण्याचा पुरेपुर प्रयत्न हार्दिक पांड्याने केला.

त्याच्या येण्याने भारतीयांच्या आशा कुठेतरी पल्लवीत झाल्या. पांड्याने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आघाडीची फलंदाजी कोलमडल्याचे कोणतेही दडपण न घेता पांड्याने धाव बाद होण्यापूर्वी ४६ चेंडूत ७६ धावांची खेळी केली, आणि जलद गतीने अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम रचला. पण दुर्दैवाने नशीबाने साथ दिली नाही आणि तो धावबाद  झाला. अर्थात त्याची विकेट जाण्यासाठी सगळ्यांनी जाडेजाला जबाबदार धरलं ही वेगळी गोष्ट आहे. भारतीय संघाची एकमेव आशा असलेल्या पांड्याला मैदानातून तंबूत परतावं लागलं तेव्हा दु:ख त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं. आक्रोश करत स्वत:ला दुषण देत तो तंबूत परतला.  मैदानात त्याची विकेट सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेली. ‘ पण हा प्रवास खूप चांगला होता. भारतीय संघाने जिंकण्यासाठी आपले शंभर टक्के दिले. सगळ्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद’ असं ट्विट त्याने केलंय. हार्दिकच्या या ट्विटवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून कुमार संगकारापासून अनेक सेलिब्रिटींनी त्याचं कौतुक केलंय.