भारतात दरदिवशी शेकडो लोक अपघातात मृत्यूमुखी पडतात. अशा कितीतरी लोकांना आणि वेगवेगळ्या आजारांशी लढत असलेल्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते.  कधी कधी नातेवाईकांपैकी एखादा रक्तदाता मिळतो पण अनेकवेळा त्याचा रक्तगट जुळत नाही आणि बाहेरून रक्त मागवावे लागते. अशा वेळी कामी येतात त्या ब्लॅड बँक, पण काही रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा रक्ताच्या पिशव्या उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते किंवा अशा प्रकराच्या अडचणींना समोरे जावे लागते. आता तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की गेल्या ५ वर्षांत ६ लाखांहून अधिक रक्त पिशव्यांची नासाडी झाली असल्याचे समोर आले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील वृत्तानुसार, गेल्या पाच वर्षांत ६ लाख लिटरहून अधिक रक्ताची नासाडी झाली आहे. भारतात दरवर्षी ३० लाख ब्लड युनिट कमी पडतात. अनेकांना रक्ताची नितांत गरज असते. वेळेवर रक्त मिळाले नाही तर जीव गमवण्याचा धोका असतो, पण अशाही परिस्थितीत रक्ताची अशाप्रकारे नासाडी समोर येणे हे धक्कादायकच म्हणावे लागले. २०१६ ते १७ या एका वर्षांच्या काळात ६.५७ लाख ब्लड युनिटची नासाडी झाल्याचे माहितीच्या अधिकाराअर्तंगत समोर आले आहे. गेल्या पाच वर्षातली ही रक्ताची नासाडी मोजायचीच झालीच तर पाण्याचे जवळपास ५३ टँकर भरतील एवढं रक्त वाया गेलं आहे. रक्ताची इतक्या मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो. भारतीय रेड क्रॉस सोसायटीचे डॉक्टर जरीन भरूचाने दिलेल्या माहितीनुसार फक्त ५०० युनिटपर्यंत रक्त संचय करणे बंधनकारक आहे पण काही जण १ ते ३ हजारांपर्यंत ब्लड युनिटचा संचय करतात त्यामुळे हे रक्त साठवण्यासाठी  जागाच नसल्याने रक्ताची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. असं म्हणतात की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, यामुळे रुग्णाचे प्राण वाचतात पण अशा परिस्थितीत ब्लड बँकांकडून होणारी रक्ताची मोठ्या प्रमाणात नासाडी कितपत योग्य आहे?