आजच्या घडीला आपल्यातील वेगळेपण दाखविण्यासाठी कोणती व्यक्ती काय करेल याचा नियम नाही. भारतीय स्टंटबाजाने अशाच प्रकारे थक्क करुन सोडणारे प्रात्यक्षिक दाखवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ नावाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या हरियाणातील अमनदीप सिंग याचे कसब पाहून तुम्ही चक्रावून जाल. या स्टील मॅनने १५० किलो वजनाच्या दोन व्यक्तींना आपल्या दाताने उचलण्याचा करिश्मा करुन दाखवला. याव्यतिरिक्त २० मोटर सायकली थोपविण्याचे कसबही दाखवून दिले. ५० बियरच्या बाटल्यांचा चुरा तो आपल्या एका बुक्कीमध्ये करतो. त्याच्या शरीरावरुन कार गेली तरी तो सुस्थीत राहतो. या गोष्टी आपण यापूर्वी देखील पाहिल्या असतील किंवा अशा कसबाबद्दल ऐकलेही असेल. मात्र अमनदीप सिंगला स्टील मॅन ऑफ इंडियाची उपलब्धी तेंव्हा खरी ठरते जेंव्हा तो शरिराच्या नाजूक भाग असणाऱ्या अंडकोषावर हातोड्याचे वार झेलतो. आपल्यातील या कौशल्याच्या जोरावर सध्या तो ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये आपले नाव यावे यासाठी प्रयत्न आहे.

हरियाणीतील एका छोट्या गावात जन्म घेतलेल्या अमनदीपने वयाच्या सातव्या वर्षापर्यंत मार्शल आर्टचे शिक्षण घेऊन दहाव्या वर्षी आपल्या वयाच्या मुलांमध्ये शक्तीशाली बनला. त्यानंतर त्याने आपल्या ताकतीच्या जोरावर भयानक स्टंट करण्याचे सुरुच ठेवले. जगातील सर्वात शक्तीशाली स्टंटमॅन बनन्याचे स्वप्न अमनदीप सध्या पाहत आहे. आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणारा अमनदीप प्रत्येक महिन्याला तब्बल ३००० विद्यार्थ्यांना कराटे आणि मार्शल आर्टचे प्रशिक्षण देतो.

अमनदीप आपल्या अफलातून आणि भयावह अशा स्टंटनी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला आहे. आपल्यातील कसब अधिक लोकप्रिय करण्यासाठी अमनदीप कसून सराव करत असतो. सरावादरम्यान तो आपल्या डोक्यावर आणि शरीरावर घाव करुन घेतो. त्याने आपल्या स्टंटबाजीने २००५ साली मिस्टर अंबाला हा किताब पटकविला आहे. त्यानंतर २००९ मध्ये जगभरातून मॉडेलिंगच्या रिंगणात उतरलेल्या १५ हजार शिख समूदायाच्या स्पर्धकातून त्याने ‘स्टील मॅन’  किताब पटकविला होता.