पोस्टरबाजी काही आपल्याला नवीन नाही. निवडणुका आल्या काय गेल्या काय. सगळे माननीय दादा, राव, रावजी, ताई पोस्टरवरून शक्य तितका सोज्वळ चेहरा करून जनतेशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.

पण मध्य प्रदेशमध्ये जे झालं ते काहीतरी अचाट आहे. इंदूर शहराच्या महापौरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या तसबिरीला चक्क हार घातला!

आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांना एवढं उच्च स्थान देणाऱ्या त्या पहिल्याच असाव्यात. याहीपुढचा गोंधळ म्हणजे या महापौर भाजपच्याच आहेत!

इंदूरच्या महापौर मालिनी गौड २०१५ साली चांगल्या मतांनी निवडून आल्या होत्या. अलीकडे त्यांच्या घरी असलेल्या काही कार्यक्रमानिमित्त त्यांचे समर्थक आणि राजकीय व्यक्ती त्यांच्या घरी जमले होते. मालिनी गौड यांच्या पतीचं काही काळापूर्वी निधन झाल्याने त्यांच्या घरी त्यांनी त्यांच्या पतीचा फोटो तसबिरीत लावून त्याला फुलांचा हार घातला होता. त्यांच्या भावना आपण समजू शकतो.

पण या तसबिरीच्या आसपास पाहिल्यावर महापौर मॅडम भावना बाजूला ठेवून जरातरी विचार करतात का, असा प्रश्न सगळ्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.

मा. महापौरांनी आपल्या दिवंगत पतीच्या तसबिरीशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या तसबिरी लावल्या होत्या आणि त्या तसबिरींना चक्क फुलांचा हार घातला होता!

आता एखाद्याच्या तसबिरीला हार घातल्यावर त्याचा अर्थ काय होतो हे एखाद्या लहान पोरालाही कळेल. पण माननीय महापौरांच्या हे गावीही नसावं. न्यूज-१८ ने दिलेल्या बातमीनुसार त्यांच्या घरात चाललेला हा कार्यक्रम संपेपर्यंत हे कोणाच्याही लक्षात आलं नाही.

शेवटी या फोटोबाबत काँग्रेसच्या एका आमदाराने टीका केल्यावर सगळी सारवासारव केली गेली. पण तोपर्यंत हा फोटो नेटवर व्हायरल झाला होता.

आता भाजपच्या महापौरांनी भाजपच्या (हयात असलेल्या) दोन बड्या नेत्यांच्या फोटोला असा हार घालावा हे जरा अतीच झालं. पण उत्साहाच्या भरात होतात चुका. गौड मॅडम फारच धडाडीच्या कार्यकर्त्या असाव्यात.