कल्पना करा एका मोठ्या मैदानात सगळेच छान तयार होऊन गरबा खेळण्यासाठी आले आहेत. ढोलिदा ढोल धिमो, पंखिडा ओ पंखिडा, ओढणी ओढू ओढू अशा गरब्यांच्या गाण्यांवर सगळ्यांनी ताल धरला आहे. या गाण्यांच्या ओळींवर रास गरबा रंगला आहे आणि अचनाक ‘गुजरात मा आवेछे केजरीवाल’ असे गाण्याचे बोल सुरु होतात. मग या गाण्यांवर जमेल का तुम्हाला ताल धरायला ? हा प्रश्न वाचून तुमची गंमत तर केली जात नाही ना असा प्रश्न तुम्हालाही पडेल. पण जर पुढच्या नऊ दिवसांत गरबा खेळायला गेलात आणि चुकून  ‘गुजरात मा आवेछे केजरीवाल’ असे गाणे वाजले तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण सध्या सोशल मीडियावर त्यातून गुजरातमध्ये तर या गाण्याची भारीच चर्चा आहे.
२०१७ ला गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. मोदींचा बालेकिल्ला असलेल्या गुजरामध्ये केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला आपले पाय रोवायचे आहे. त्यामुळे गरबा आणि आगमी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे गाणे बनवून ते व्हायरल करणे म्हणजे आपच्या प्रचाराचा नवा फंडा असू शकतो अशा चर्चा रंगत आहेत. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. यात आपची टोपी घालून काही तरुण ‘गुजरात मा आवेछे केजरीवाल’ या गाण्यावर गरबा खेळताना दिसत आहेत. ‘आप का व्हिडिओ’ चा हा व्हिडिओ असल्याचे समजते.