इराकी सैन्याने एका आयसिसच्या दहशतवाद्याचा एक फोटो प्रकाशित केलाय, जो पाहून अनेकांना आपलं हसू अनावर होईल हे नक्की. आयसिस ही जगातल्या सर्वात क्रूर दहशतवादी संघटनेपैकी एक आहे. तेव्हा या संघटनेतल्या दहशतवाद्यांच्या क्रूरपणाची आपण कल्पना न केलेलीच बरी. पण या क्रूर दहशतवाद्यांची अक्कल कधी कधी गुडघ्यात असते हे इराकी सैन्याने प्रकाशित केलेल्या फोटोतून दिसून येतंय.
आयसिसच्या ताब्यातून मोसूल शहर घेतल्यानंतर सैन्याने दहशतवाद्यांची धरपकड सुरू केलीय. सैन्याच्या हातात सापडल्यावर शिक्षा होणार हे दहशतवाद्यांना ठावूक आहे, तेव्हा सैन्याच्या तावातडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी या दहशतवाद्यांनी वाट्टेल त्या मार्गाने पळून जाण्याच्या पर्याय स्विकारला. पण सैन्याच्या करड्या नजरेतून सुटून जाणं काही सहज शक्य नाही हे त्यांनाही माहिती होतं, तेव्हा महिलांसारखे कपडे परिधान करून निसटण्याचा मार्ग अनेकांनी स्विकारला. पण हाही मार्ग फसला. इराकी सैन्याने गेल्या आठवड्याभरात असाच प्रयत्न करणाऱ्या अनेक दहशतवाद्याचे फोटो प्रकाशित केलेत जे फारच मजेशीर आहे.

Viral Video- मुंबईत खड्डे नाहीत, हे तर शानदार नक्षीकाम!

यातला एक फोटो तर सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यात आयसिसच्या दहशतवाद्याने पळून जाण्यासाठी महिलेसारखा वेश परिधान केला. अगदी ओठांना लिपस्टिक, आयशॅडो, चेहऱ्यावर फाऊंडेशन असं एकूण एक तयारी करून हा दहशतवादी पळण्याच्या तयारीत होता. पण शेमडं पोरगंही करणार नाही असा महामूर्खपणा या दहशतवाद्याने केला. महिलांसारखा मेकअप केला, कपडेही घातले पण त्याने आपली दाढी मिशी मात्र काढली नव्हती. तेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दहशतवाद्याला बघता क्षणीच सैनिकांनी पकडले. असा मूर्खपणा करणारा तो काही एकटाच नव्हता, अशा प्रकारे महिलांचे कपडे परिधान करून पळून जाणाऱ्या शेकडो दहशतवाद्यांना सैनिकांनी अटक केलीय. अर्थात हे सगळे आता तुरूंगाची हवा खात आहेत.