दोन दिवसांपूर्वी जयपूरमधल्या सीसीडीच्या फ्रिजमध्ये एका ग्राहकाला झुरळ सापडले होते. हा प्रकार पाहून चक्रावून गेलेल्या त्या ग्राहकाने याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड केला. यात सीसीडीमधली महिला कर्मचारी त्याच्याकडून फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न होती आणि या झटापटीत त्याचा फोनही खाली पडला होता, वरून या महिला कर्मचा-याने व्हिडिओ काढणा-या ग्राहकाच्या कानशीलात लगावली होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीसीडीची खूपच बदनामी झाली.

पण आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे. अर्पण वर्मा या विद्यार्थ्यांने सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड केला होता. आता याच विद्यार्थ्यांविरोधात सीसीडीच्या प्रियदर्शनी या महिला कर्मचा-याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. ‘अर्पण आणि त्याचे काही मित्र सीसीडीमध्ये आले होते, त्यांना कॉफी हवी होती पण कॉफी काही काळापुरताच उपलब्ध असल्याने त्यांची ऑर्डर आपण स्विकारली नाही असे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे राग अनावर झालेल्या अर्पणने तिला शिवीगाळ केली तसेच पुन्हा येऊन धडा शिकवण्याची धमकीही दिली असेही तिने पोलिसांना सांगितले असल्याचे हिंदुस्थान टाइम्सने म्हटले आहे.

तिला शिवीगाळ करुन तो आणि त्याचा मित्र कॅफेतून बाहेर पडले पण जाता जाता तिला धडा शिकवण्याची धमकी देऊन गेल्याचेही तिने सांगितले. थोड्यावेळाने परत येऊन त्याने आणि त्याच्या मित्रांनी येऊन किचनमधलं चित्रिकरण करायला सुरूवात केली, हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचा धमक्या तो आपल्याला देत होता आणि नंतर वादावादीतून हे प्रकरण घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आपल्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी मनक चौक पोलीस स्टेशनमध्ये तिने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.