जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर कंपनी असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जगातलं श्रीमंत व्यक्ती ठरल्यानंतर त्यांचं कौतुक आपसुकच आलं, पण हे कौतुक त्यांना फार काही अनुभवता आलं नाही. कारण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान त्यांना काही तासांपुरताच अनुभवता आला. गुरूवारी अॅमेझॉनच्या समभागांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने बिल गेट्स यांना मागे टाकत जेफ हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत विराजमान झाले.

अॅमेझॉनच्या समभागांमध्ये गुरूवारी १.३ टक्क्यांची वाढ झाल्याने त्यांची किंमत १ हजार ५ डॉलर म्हणजे जवळपास ६९, ५४८ रुपयांवर जाऊन पोहोचली. तीन महिन्यांपूर्वीच जेफ बेझोस जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी होते. त्यावेळी त्यांनी अॅमान्किओ ऑर्तेगा आणि वॉरन बफेट यांना मागे टाकलं होतं. मात्र अवघ्या तीनच महिन्यांमध्ये काही तासांसाठी का होईना जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

गुरूवारी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर अॅमेझॉनचे समभाग ६९, ५४८ रुपयांवर जाऊन पोहोचले. हा चढउतार दिवसभर कायम होता, शेवटी अॅमेझॉनचे शेअर खाली उतरून ते १ हजार ४६ डॉलर म्हणजे ६७, १५८ रुपयांवर पोहोचले. त्यामुळे श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान झालेले जेफ पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आले. जेव्हा अॅमेझॉनच्या समभागाचे भाव वधारले होते तेव्हा बेझोस यांच्या संपत्तीत वाढ होऊन ती एकूण ९०.९ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स संपत्ती ९०.७ अब्ज इतकी होती. पण शेअर बाजार बंद होण्याच्या सुमारास अॅमेझॉनच्या समभागांमध्ये घसरण झाली.

वाचा : म्हणून इथे अंत्ययात्रेवर लग्नापेक्षाही सर्वाधिक खर्च केला जातो