एखाद्या नववधूला लग्नाचा आहेर म्हणून तुम्ही काय द्याल? पैसे, भांडी, पुष्पगुच्छ, कपडे, दागिने वगैरे वगैरे. हा आता ही यादी कदाचित वाढतही जाईल. पण साधरण नवविवाहित जोडप्यांना आपल्याकडे पैसे किंवा अशाच वस्तूंचा आहेर दिला जातो. मध्य प्रदेशमधल्या मंत्र्यांनी मात्र आहेर म्हणून वधूला चक्क धुपाटणं भेट म्हणून दिलंय. आता धोपाटण्याचा आहेर देणं हा प्रकार तुम्ही पहिल्यांदाच पाहिला किंवा ऐकला असेल. पण हे खरं आहे. या मंत्र्यांनी ७०० नववधूंना लग्नात आहेर म्हणून धुपाटणे दिली आहेत. आता याला कारणही तसेच आहे म्हणा.

मध्य प्रदेशचे ग्रामविकास मंत्री गोपाल भार्गव यांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गरहाकोटा इथल्या त्यांच्या गावी नववधूंना धोपाटण्याचं वाटप केले आहे. येथे सामूहिक विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली होती. आपण जेव्हा केव्हा गावात भेट देतो, तेव्हा इथल्या महिलांचे पती दारू पिऊन मारहाण करतात, अशी तक्रार असते. गावातील अनेक पुरूष दारूच्या आहारी गेले आहेत. ज्या महिला काबाडकष्ट करून जी तुटपुंजी रक्कम कमावतात, ती या महिलांचे पती दारूवर उडवतात. अनेक संसार या दारूपायी नष्ट झाले, तेव्हा या नववधूंना धुपाटणे भेट म्हणून देण्याची अनोखी कल्पना सुचली असल्याचे गोपाल यांनी पीटीआयला सांगितले.

गोपाल भार्गव यांनी जवळपास १० हजार धुपाटणे मागवले होते. त्यातली ७०० हून अधिक धुपाटणे त्यांनी नववधूंना भेट म्हणून दिली. जर का एखाद्या नववधूचा नवरा दारूच्या आहारी गेलाच, तर त्याला अद्दल घडवण्यासाठी आणि घरगुती हिंसाचारापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी त्यांनी ही भेट नववधूंना दिली आहे. ‘शराबियोंसे सुटार हेंतु भेट’ असा संदेश त्यावर लिहिण्यात आला होता. अशा प्रकारची भेटवस्तू देण्यात काहीच गैर नसल्याचेही त्यांनी सांगितले.