एक दिवस शाळा चुकवली म्हणून राग अनावर झालेल्या आईने आपल्या मुलीला चक्क रणरणत्या उन्हात लोखंडी साखळीने बांधून ठेवले. भुकेने व्याकुळ होऊन रडत ही मुलगी तासन् तास उन्हात उभी होती. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सगळेच जण या आईवर राग व्यक्त करत आहेत. मलेशियाची राजधानी असलेल्या कुआलालंपुर मधला हा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ८ वर्षांच्या या मुलीने घरी न सांगता शाळेला दांडी मारली त्या रागातून तिच्या आईने तिला साखळीने उन्हात बांधून ठेवले. ही मुलगी सुटकेसाठी विनंती करत होती पण तरीही तिच्या आईला दया आली नाही. या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी पाजारी  जमा झाले. त्यांनी या मुलीला सोडवण्याच्या प्रयत्न केला पण पायाला साखळी बांधून त्याला कुलूप लावले होते त्यामुळे त्यांना ही साखळी उघडता येईना. अखेर शेजा-यांनी  पोलिसांना बोलावून आणले आणि पोलिसांच्या मदतीने तिची साखळी सोडली. सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी या आईला अटक केली.