महिलांच्या कपड्यांवरून अनेकदा त्यांना लक्ष्य केलं जातं. त्यांनी कोणाता पोशाख परिधान करावा आणि कोणता नाही हे ठरवण्याचा अधिकार जणू आपल्यालाच आहे अशा अविर्भावात काही तथाकथित ‘संस्कृतीचे रक्षक’ वावरत असतात. काही दिवसांपूर्वी दंगल फेम फातिमा शेखला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं, रमझानच्या पवित्र महिन्यात तिने बिकिनी घातली म्हणून तथाकथित संस्कृती रक्षकांनी तिच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती. पुन्हा एकदा अशाच संकुचित मानसिकतेचं दर्शन सोशल मीडियावर दिसून आलंय. रमझानच्या महिन्यात तोकडी पँट घातली म्हणून चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीला मारहाण करण्याचा प्रकार तुर्कीमध्ये घडला. भरदिवसा बसमध्ये इतर प्रवासी असताना या हल्लेखोराने असं करण्याचं धाडस केलं. दुर्दैव म्हणजे यावेळीही बसमध्ये उपस्थित असलेल्या प्रवशांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली.

विद्यार्थिनीने तोकडे कपडे घातले म्हणून बसमध्ये तिच्या मागे बसलेला सहप्रवाशी तिच्यावर अश्लिल भाषेत टीका करत होता. पण तिने त्याच्या टोमण्यांकडे साफ दुर्लक्ष केलं. तेव्हा जसा आपला थांबा आला तेव्हा या प्रवाशाने लक्ष नसलेल्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा लगावला. या मुलीने त्याला पकडून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण तिला शिव्या देत त्याने तिथून पळ काढला. दुर्दैवाने भरदिवसा हा प्रकार डोळ्यादेखत घडत असताना इतर प्रवाशांनी मात्र बघ्याची भूमिका घेणं पसंत केलं. बसमध्ये असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झालाय.
हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या इसमाला अटक केली खरी, पण प्राथमिक चौकशी करून त्याला नंतर सोडून देण्यात आलं.