मोहालीमध्ये बँकेतील तब्बल साडेसात लाख रुपयांची कॅश लुटणाऱ्या वकिलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या आरोपीचं नुकतंच लग्न झालं होतं. संसार करायचा म्हणजे खर्च आलाच त्यातून लग्नासाठीही त्याने कर्ज काढलं होतं. हे कर्ज फेडायचं कसं हा प्रश्न त्याच्यासमोर होता, तेव्हा बँक लुटण्याचा पर्याय त्याला सोपा वाटला आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून बँकेतून साडेसात लाखांची रोकड लंपास केली. मोहालीमधल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत त्याने दरोडा घातला. चोरी करून विमानतळाच्या दिशेनं पळून जाण्याचा त्याचा प्लान होता. पण हा प्लान पुरता फसला, कारण पळण्याच्या नादात त्याच्या गाडीने खांबाला धडक दिली आणि गाडीवर लावलेली नेमप्लेट खाली पडली.

पोलिसांनी याच नेमप्लेटवरून वकिलाला काही तासांच्या आतच पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याचं नाव मनजिंदर असल्याचं समजत आहे. त्याचं हल्लीच लग्न झालं होतं. लग्नानंतर वाढलेला खर्च त्यातून डोक्यावर असलेलं कर्च या सगळ्याला वैतागून त्याने चोरी करण्याचं ठरवलं होतं. चोरी करून मिळवलेल्या पैशातून कर्ज फेडण्याचा त्याचा विचार होता पण यात काही त्याला यश आलं नाही. पोलिसांनी त्याला अटक केली.

वाचा : म्हणून इथे अंत्ययात्रेवर लग्नापेक्षाही सर्वाधिक खर्च केला जातो