ब्रिटनमधील मँचेस्टर एरिना येथे सोमवारी रात्री पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान स्फोट झाला. या स्फोटात २२ हून अधिक जण ठार झालेत तर ५० हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यावेळी एका भारतीय वंशाच्या शीख चालकांनी जखमींना मोठी मदत केली. स्फोट झाल्यानंतर सगळेच आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले कित्येक जखमींना या शीख टॅक्सी चालकाने सुरक्षितस्थळी पोहोचवण्यासाठी मदत केली.

या चालकाने आपल्या टॅक्सीवर मोठा कागद चिटकवला होता. हल्ल्यातील जखमींना विनाशुल्क रुग्णालयात किंवा सुरक्षित पोहोचवण्यात येईल, असे त्याने आपल्या टॅक्सीवर लिहिले. त्याने अनेकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आणि माणसुकीचे नवे उदाहरण जगासमोर ठेवले. प्रत्यक्षात पाहायला गेले तर अमेरिकेसारख्या ठिकाणी भारतीयांवर हल्ले होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, पण कितीही झाले तरी भारतीयांना द्वेष माहिती नसून ते फक्त माणुसकी हा एकच धर्म जाणतात, हे या चालकाने जगाला दाखवून दिले. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांना मदत देऊ करणाऱ्या या चालकाचे नाव मात्र कळू शकले नाही.