विकेंडला किंवा अगदी एरवीही हॅंगआऊट करण्यासाठी तरुणांबरोबरच सर्वच वयोगटातील लोकांकडून ‘मॅकडोनल्डस’ला पसंती देण्यात येते. या ठिकाणच्या बर्गरसोबत इतर यम्मी पदार्थांबरोबरच ग्राहक मॅकफ्लरी किंवा मॅकर्व्सिलसारख्या पदार्थाचाही आस्वाद घेतात. मात्र हे आईस्क्रीम ज्या मशिनमधून येतं ते मशिन तुम्ही आतून पाहिलंत तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

मॅकडी या जगभरात नावाजलेल्या फूडचेनमध्ये काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने आपल्याकडील हे आईस्क्रीम मशिनचे फोटो थेट आपल्या ट्विटर हॅंडलवर पोस्ट केले आहेत. अमेरिकेतील लुईझियाना या शहरात राहणारा हा कर्मचारी असून, तो अनेक वर्षे मॅकडोनल्डमध्ये कामाला होता. त्याने टाकलेले हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, आतापर्यंत त्याला १३ हजारांहून अधिक रिट्वीट मिळाले आहेत.

या आईस्क्रीम मशिनच्या फोटोखाली त्याने हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, असेही म्हटले आहे. मी खोटे बोलत आहे असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांच्यासाठी मी हे फोटो टाकत आहे, असेही त्याने आपल्या पोस्टखाली लिहिले आहे. या मशीनच्या भागांमध्ये अतिशय घाण अडकलेली दिसत असून, ग्राहकांच्या आरोग्याशी हेळसांड होत असल्याचेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियावर ही पोस्ट टाकल्याने अनेकांनी त्यावर धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर नियमित मॅकडीमध्ये किंवा त्यासारख्या खाद्यपदार्थांच्या स्टोअरमध्ये जात असाल तर सावधान!