जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान तुम्हाला आठवतच असेल. लहानपणीच अनेक आजारांमुळे तिचे वजन इतके वाढत गेले की तरूणपणी तिचे वजन चक्क पाचशे किलोच्याही वर गेले. तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिचे वजन घटवण्यात आले. पण कमी वयात लठ्ठपणाचे शिकार झालेली ती काही पहिली नाही. जगभरात अनेक लहान मुलं लठ्ठपणाचे बळी होत आहे. याला अनेक कारणं असतील पण जंक फूड हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण. तेव्हा इंडोनेशियामधल्या एका मुलाचा फोटो समोर आलाय. हा फक्त दहा वर्षांचा मुलगा आहे पण न्यूडल्स कोका-कोला यासारखे जंक फूड खाऊन त्याचे वजन इतके वाढले आहे की या मुलाला चालणं देखील मुश्किल झालं आहे.

या मुलाचं नाव आदे सोमंत्री आहे. फार कमी वयातच तो लठ्ठपणाचा शिकार झाला आहे. दररोज दिवसांतून किमान पाचवेळा तरी त्याला अन्न लागतं. तीन माणासांचं जेवण तो एकावेळी जेवतो. त्याच्या या जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे त्याचे आई- वडील देखील त्रस्त आहेत. डॉक्टरांनाही त्याच्या या अवस्थेकडे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला आहे. एवढ्या कमी वयात चौप्पट वजन असणारं लहान मुल डॉक्टरांनाही यापूर्वीही कधी पाहिलं नसेल. त्याच्यावर गेल्या एप्रिल महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटाकडची ८५ टक्के चरबी कमी करण्यात आली आहे.

VIDEO : मृत आईला बिलगून दूध पीत होता चिमुकला, दृश्य बघून पोलिसांनाही अश्रू अनावर

लवकरच त्याचे वजन आणखी कमी करण्यात येईल. आदेचे वजन जास्त असल्याने त्याला चालताही येत नाही, त्याच्या मापाचे कपडेही देखील मिळत नसल्याने त्याचे घरातून बाहेर पडणं देखील मुश्किल झालं होतं. घरातल्या बाथटबमध्ये तो दिवसभर बसून असायचा. पण शस्त्रक्रियेनंतर आणि जंक फूड खायचे त्याने बंद केलं तर लवकरच तो इतर मुलांसारखा हिंडू फिरू शकतो अशी आशा डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबीयांना दिलीय.