भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांना ठार केले. संरक्षण मंत्रालय आणि लष्कराने गुरुवारी पत्रकार परिषद घेत या ऑपरेशनची माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवर हल्ला करत मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला याचे समाधान भारतीयांना वाटते. त्यामुळे लष्कराचे कौतुक करणारा #ModiPunishesPak हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिगमध्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विटरवर नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक करत मोदींनी भारत हे ताकदवान राष्ट्र असून ते दहशतवादाला खतपाणी घालत नाही दाखवून दिले आहे.’ असे ट्विट करत त्यांनी भारतीय लष्कराचेही कौतुक केले आहे.
२५ सप्टेंबरला ‘मन की बात’ या कार्यक्रमात उरी हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना शिक्षा देऊ असा इशारा मोदींनी दिला होता. पाकिस्तानी दशतवाद्यांनी उरी येथील लष्करी तळावर हल्ला केला होता. पहाटे केलेल्या या हल्ल्यात भारताचे १९ जवान मारले गेले होते. तेव्हा भारताने याला उत्तर देत पाकिस्तानची कोंडी करावी अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. साम दाम दंड भेद वापरून पाकिस्तानला वठणीवर आणावे अशी मागणी होत होती. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा राष्ट्र असल्याचे भारताने सुनावले होते. तसेच पाकला अद्दल घडवण्यासाठी सिंधु पाणी करार रद्द करण्याचा विचारही भारत करत आहे. पण असे असताना पाकिस्तानविरुद्ध भारत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचे आरोप होत होते. त्यामुळे या यशस्वी सर्जिकल स्ट्राईक निमित्तांने आरोपांची तोफ डागणा-यांचा ट्विटरवर चांगलाच समाचार घेतला जात आहे. ज्यांनी मोदींच्या इशाराची खिल्ली उडवली किंवा ज्यांनी असे आरोप केले त्या दिग्गजांना #ModiPunishesPak हॅशटॅग वापरून टॅग केले जाते आहे. तेव्हा एकिकडे लष्कराच्या या धडक कारवाईचे कौतुक करणारे तर दुसरीकडे मोदींच्या नेतृत्त्वावर शंका घेणा-यांना टोमणे मारण्याचे चित्र ट्विटरवर दिसत आहे.