रस्त्यावर चरायला मोकाट सोडलेल्या गुरांना भरधाव वेगात येणारी गाडी उडवते आणि या अपघातात गुरांचा मृत्यू होतो. माणसांना त्या रस्त्यावर जाऊ नका पुढे धोका आहे असे सांगता तरी येते पण या मुक्या जनावरांचे काय? कोणी वाली नसला की ही गुरे रस्त्यांवर येतात, वाहने वेगात आली की बिथरतात, काही वेळा वाहानांची धडक बसून त्यांचा मृत्यू होतो. तर काही घटनांत चालकही गंभीर जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याची उदाहणे आहेत. हे प्रकार आता मध्य प्रदेशमध्ये नित्याचेच होत चालले आहेत. चूक कोणाची हे काही कळायला मार्गच नसतो. चूक मोकाट सोडलेल्या जनावरांची, बेजबाबदार मालकाची की चालकाची असा तिढा पोलीसांकडे रोजच सोडवायला येतो. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी ठरत चाललेल्या या मोकाट जनावरांच्या समस्येवर रामबाण उपाय मध्य प्रदेश पोलिसांनी शोधून काढला आहे. इथल्या गुरांच्या शिंगावर त्यांनी रेडिअम चिटकवले आहे. रात्रीच्या अंधारात रेडिअम चमकतो त्यामुळे कदाचित दूरून येणा-या वाहानांना ते दिसतील आणि दुर्घटना टळतील म्हणून हे रेडिअम स्टिकर्स शिंगावर चिटकवण्यात आले आहेत.
गेल्या पाच दिवसांत पोलिसांनी मोकाट सोडलेल्या १०० हून अधिक गुरांच्या शिंगांवर हे स्टिकर्स लावले आहेत. मोकाट सोडलेली जनावरे ही रस्त्यावर बसून असतात किंवा रस्त्यांच्या मधून चालतात त्यामुळे अनेक दुर्घटना होतात त्यामुळे हा उपाय शोधून काढला असल्याची माहिती त्यांनी दिली. २०१५ मध्ये मोकाट सोडलेल्या जनावरांमुळे ५५० हून अधिक चालक जखमी झाले होते अशी माहितीही मध्यप्रदेश पोलिसांनी दिली. आता ही चमकदार शिंग तरी दुर्घटना टाळतील अशी प्रार्थना या पोलिसांनी केली आहे.