आईच्या अपमानाचा बदला, त्यासाठी मुलाने उचलेले टोकाचे पाऊल, अशा अनेक गोष्टी तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिल्या असतील. मात्र असाच एक प्रकार प्रत्यक्षात भाईंदरमध्ये घडला. शेजाऱयांनी आईसोबत केलेल्या गैरवर्तणुकीचा बदला घेण्यासाठी एक तरुण थेट तलवार घेऊन खिडक्यांच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावर चढला.

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार भाईंदरमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय धोनी गोपालच्या घरात पूजा सुरू होती. यावेळी धोनी गोपालच्या आईचा शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत वाद झाला. यावेळी शेजाऱ्या राहणाऱ्या महिलेने धोनीच्या आईच्या श्रीमुखात भडकावली. यामुळे संतप्त झालेला धोनी गोपाल शेजाऱ्यांकडे गेला. मात्र त्यांनी दरवाजा बंद केल्याने धोनी गोपाल खिडक्यांच्या मदतीने तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचला.

हा संपूर्ण प्रसंग तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने चित्रीत केला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये २० वर्षांचा धोनी गोपाल इमारतीवर चढताना दिसतो आहे. एक एक करुन धोनी तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचतो. त्यानंतर तो तलवारीच्या मदतीने खिडकीच्या काचा फोडतो. या व्हिडीओत धोनी गोपालचा राग स्पष्ट दिसतो आहे. या घटनेवेळी इमारतीखाली मोठी गर्दी जमा झाली होती. अखेर लोकांनी धोनी गोपाळला शांत केले. त्यानंतर या घटनेची तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्याने त्याला अटक झाली.