फेसबुकने ‘फेसबुक लाइव्ह’चा पर्याय दिला खरा पण आता याच पर्यायाचा चुकीच्या पद्धतीने वापर  केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी एकाने प्रेमभंगामुळे आपल्या आत्महत्येचा व्हिडिओ लाइव्ह केला होता. तर दुसरीकडे बलात्काराचा व्हिडिओ लाइव्ह करण्याचाही धक्कादायक प्रकार दोन महिन्यांपूर्वी समोर आला होता. थायलंडमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे जो पाहून अनेकांचे मन हळहळले. एका माथेफिरू प्रियकराने त्याच्या प्रेयसीच्या मुलीची हत्या केली. या हत्येचा व्हिडिओ त्याने लाइव्ह केला. चिमुकलीची हत्या करून झाल्यानंतर या माथेफिरूने स्वत:ही आत्महत्या केली.

थायलंडमधल्या वुट्टिसन वोंगटैल याने रागातून आपल्या प्रेयसीच्या ११ महिन्यांच्या मुलीचा जीव घेतला. तिला दोरीने बांधून छतावरून या नराधमाने फेकून दिले. याचा व्हिडिओही त्याने लाइव्ह केला. त्यावेळी घराबाहेर असलेली या मुलीची आई हा व्हिडिओ बघत होती. तिच्याच नात्यातल्या एकाने फेसबुकवरचा हा व्हिडिओ तिला दाखवला. लाइव्ह व्हिडिओ पाहूनही हतबल आई काहीच करू शकली नाही. ४ मिनिटांचा हा व्हिडिओ वुट्टिसनच्या फेसबुक अकाउंटवर पुढचे २४ तास होता. या घटनेने सगळेच हादरुन गेले आहेत. बाळाचा जीव घेतल्यानंतर त्याने देखील आत्महत्या केली. या खुनाचे कारण मात्र अद्यापही समजू शकले नाही. शेजारी असलेल्या एका पडक्या इमातीच्या छतावर हा प्रकार घडला.