सरकारदरबारी काय काय उत्तरं मिळतील याचा नेम नाही. एखादी साधी गोष्ट विचारल्यावर नक्की काय करून आपल्याला वाचेला लावलं जाईल याचाही नेम नाही. बिरबलाच्या ‘घोडा का अडला?’ गोष्टीसारखं अनेक प्रश्नांना इथे एकच उत्तर नसतं तर वेगवेगळ्या प्रश्नांना वेगवेगळ्या काँबिनेशनने तिसरीच उत्तरं मिळतात.

आपल्या देशात लाखोंना दोन वेळचं अन्न मिळत नाही पण धान्याची कोठारं तुडुंब भरलेली आहेत. या कोठारांमध्ये तुडुंब भरलेलं धान्य सडून जातं. कोणालाही ते खायला मिळत नाही. पण धाडी टाकून जप्त केलेले ड्रग्ज मात्र चोरीला जातात.

नागपूरमध्ये ही घटना घडली आहे. इथल्या रेल्वे पोलिसांच्या गोदामातून २५ किलो ड्रग्ज गायब झाले आहेत. आणि गंमतीची बाब म्हणजे जप्त केलेल्या ड्रग्जची ही पोती उंदरांनी कुरतडून त्यातली ड्रग्जची पावडर खाल्ल्याने २५ किलो ड्रग्जचा हिशोब लागत नसल्याचा अजब आणि हास्यास्पद दावा तिथल्या पोलिसांनी केला आहे. ‘मुंबई मिरर’ च्या वृत्तानुसार तिथले सीनियर इन्स्पेक्टर पन्हेकर यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पोती कुरतडली वगैरे ठीक आहे पण उंदरांनी ड्रग्ज खाल्ले? ते सुध्दा २५ किलो? ये बात कुछ हजम नही होती.

आपल्याकडे सरकारी यंत्रणेला अनेकदा डोळ्यासमोरचं दिसत नाही. किंवा त्याच्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. मग पोलीस ठाण्यामध्ये आपल्या समोर बसलेली व्यक्तीसुध्दा पोलिसांना दिसत नाही आणि त्या गुंडाविरूध्द किंवा ‘समाजसेवका’विरूध्द तक्रार करायला आलेली सामान्य पीडित व्यक्ती मात्र सरकारी यंत्रणेत व्यवस्थित गुंडाळली जाते.

आपल्याच गोदामातून होणाऱ्या चोरीला आळा घालायला अपयशी ठरलेल्या नागपूर रेल्वे पोलिसांनी आपला ढिसाळ कारभार लपवण्यासाठी हे कारण दिल्याचं नक्कीच वाटतं. य़ा जप्त झालेल्या मालाची अवैधपणे विक्री होत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

म्हणे, उंदरांनी २५ किलो ड्रग्ज खाल्ले. उंदरांनी खायला ते काय तूप आहे का?