रस्त्यावर चालताना तुम्ही एका गोष्टींचं निरीक्षण नक्कीच केलं असेल, ती म्हणजे भारतीयांना हॉर्न वाजवण्याची खूप सवय असते. वाहतूक कोंडीत अडकलेले चालक पुढे काही होऊ शकत नाही हे माहिती असताना देखील दहावेळा हॉर्न वाजवत बसतात. तर कधीतरी उगाचचं हॉर्न वाजवतात. आपल्या हॉर्न वाजवण्याने समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो याचा विचारही ते करत नाही. आपल्याकडे तर गाड्यांच्या मागेही ‘हॉर्न ओके प्लीज’ असंच लिहिलेलं असतं. पण गाडी चालवताना सतत हॉर्न वाजवणाऱ्या या चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे लवकरच रस्त्याच्याकडेला ‘स्मार्टलाइफ पोल्स’ ही नवी प्रणाली बसवण्यात येणार आहे. आता याचा आपल्याला काय उपयोग असा प्रश्न तुम्हालाही असेलच. तर या स्मार्टलाईफ पोल्समुळे हॉर्न वाजवण्याचे कष्ट चालकाला घ्यावे लागणार नाही, पण त्याचबरोबर रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील याची मदत होणार आहे.

समोरून येत असलेल्या वाहनांमधले अंतर आणि त्याचा वेग ओळखून हे पोल्स पुढच्या चालकांना हॉर्न वाजवून अॅर्लट करणार आहेत. महामार्गावरील सुरक्षा आणि रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी एचपी ल्युब्रिकंट्स आणि लिओ बर्निट या दोघांनी स्मार्टलाइफ पोल्स हे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे पोल्स स्वत: हॉर्न वाजवून चालकांना सूचना देणार आहेत. महामार्गावर ज्या ठिकाणी नागमोडी वळणं आहेत अशा वळणांवर सुरक्षेसाठी हे पोल्स बसवण्यात येणार आहे. वायरलेस तंत्रज्ञानाने हे पोल्स एकमेकांना जोडले जातील. रस्त्यावरून येणारे वाहन, त्याचा वेग आणि दोन वाहनांमधले अंतर ओळखून ही यंत्रणा एकमेकांना सूचना पाठवणार आहे.

जम्मू आणि श्रीनगरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग एनएच १ वर याची चाचणी करण्यात आली आहे. या महामार्गावर रस्ते अपघाताचे प्रमाण अधिक आहे. रस्ते अपघातात जगात भारताचा क्रमांक पहिल्या पाच देशांमध्ये आहे. दरवर्षी रस्ते अपघातामुळे येथे लाखो लोक मारले जातात किंवा जखमी होतात असे एका सरकारी आकडेवारीनुसार समोर आले आहे. तेव्हा या नव्या तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.