कपडे धुण्याचे काम अनेकांना नकोसे वाटते. साबण्याच्या पाण्यात कपडे टाका, मग ते धुवा, त्यानंतर ते पिळून वाळत घाला, हा सर्व क्रम अनेकांना कटकटीचा वाटतो. मात्र आता तंत्रज्ञानामुळे ही कटकट संपणार आहे. कारण आता केवळ प्रकाशात ठेवताच स्वच्छ होणाऱ्या कपड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कपडे प्रकाशात ठेवले की ते आपोआप स्वच्छ होणार आहेत. विशेष म्हणजे वघ्या काही मिनिटांमध्ये ही कपडे स्वच्छ होण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या आरएमआयटी विद्यापीठाच्या संशोधकांनी अनोखे संशोधन केले आहे. या संशोधकांनी ‘नॅनो एनहान्स्ड’ कपड्यांची निर्मिती केली आहे. हा कपडा त्याच्यावर पडलेले डाग आपोआप स्वच्छ करतो. त्यासाठी या कपड्याला फक्त बल्बच्या प्रकाशात ठेवण्याची आवश्यकता आहे. नॅनो एनहान्स्ड कपडे परिधान करुन सूर्य प्रकाशात गेल्यास कपड्यांवरील डाग स्वच्छ होतात.

प्रकाशात आपोआप स्वच्छ होणाऱ्या कपड्याचा शोध लावणाऱया आरएमआयटी विद्यापीठाच्या संशोधकांच्या टिममध्ये एका भारतीय संशोधकाचा समावेश आहे. ‘नॅनो एनहान्स्ड कपडा हा आधीपासूनच ३डी संरचनेवर आधारित आहे. याच संरचनेवरुन हा कपडा विकसित करण्यात आला असल्याने तो प्रकाश खेचून घेतो. त्यामुळे या कपड्यावरचे डाग अतिशय वेगाने संपुष्टात येतात’, अशी माहिती आरएमआयटीचे संशोधक राजेश रामनाथन यांनी दिली आहे.

कपडे धुण्याचे श्रम वाचवणारे हे तंत्रज्ञान अतिशय आकर्षण आहे. शिवाय या तंत्रज्ञानाच्या आधारे निर्माण केले जाणारे कपडेदेखील स्वस्त असणार आहेत. त्यामुळे येत्या काळात कपडे धुण्याच्या, डाग घालवण्यासाठी कपडे घासावे लागण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळणार आहे.