निरोगी आरोग्य हवं असेल तर योग्य आहार तितकाच महत्त्वाचा. म्हणूनच आहारात कर्बोदके, जीवनसत्त्व, क्षार, प्रथिनयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करावा असे नेहमीच सांगितले जाते. पण एक माणूस असा आहे की ज्याच्या आहारात भात, भाजी, वरण, पोळी, मांसांहार अशा कोणत्याच अन्नपदार्थांचा समावेश नाही तरीही तो निरोगी आहे. विशेष म्हणजे यातले कोणतेही पदार्थ न खाताही त्याची तब्ब्येत अगदी ठणठणीत आहेच पण इतक्या वर्षांत कोणता आजारही आपल्याला झाला नसल्याचे ते अभिमानाने सांगतात.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ५० वर्षीय मेहमूद बट राहतात. झाडाची पाने आणि खोडं खाऊन ते आपल्या पोटाची भूक भागवतात. विशेष म्हणजे हे खाऊन आपण गेल्या २५ वर्षांत एकदाही आजारी पडलो नसल्याचे ते सांगतात. आपल्याला एकदाही डॉक्टरांकडे जावे लागले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मेहमूद यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची. गरिबीमुळे त्यांना दोन वेळचं सोडाच पण कधी कधी एकवेळंचही जेवण मिळत नव्हतं. भिक मागून आपलं पोट भरणं त्यांना मान्य नव्हतं. नोकरीही मिळत नव्हती तेव्हा पोटाची भूक भागवायला त्यांनी आजूबाजूला असणाऱ्या झाडांची पानं खायला सुरूवात केली. पण नंतर त्यांना याची एवढी सवय झाली की आता वरण, भात, पोळी भाजीपेक्षा त्यांना हाच पालापाचोळा गोड लागतो. मेहमूद आता मालाची ने- आण करण्याचे काम करतात त्यांना पैसेही चांगले मिळतात. पण आजही त्यांचीं पाने आणि खोडं खाण्याची सवय गेली नाही. रस्त्यात कुठेही झाड दिसले की थांबून पाने खातात आणि आपली भूक भागवतात. गावातल्या अनेक लोकांना त्यांचे असे वागणे सवयीचेच झाले आहे. त्यातून वडाच्या झाडांची पाने तर त्यांच्या सगळ्यात आवडीची. याच झाडांची पाने आपल्या निरोगी आरोग्याचे रहस्य असल्याचेही ते प्रत्येकाला सांगतात.

आता खाण्याची अशी विचत्र सवय असलेले मेहमूद हे काही पहिले नाही. बनारसमधल्या कटारी गावात राहणा-या कुसुमावती या गेल्या ६३ वर्षांपासून वाळू खात आहेत. लहानपणी त्यांना पोटदुखीचा त्रास झाला होता, तेव्हा गावातील वैद्याने त्यांना दुधात वाळू टाकून खाण्यास सांगितले होते, तेव्हापासून सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी त्या नियमितपणे वाळू खातात. कुसुमावती यांचे वय ७८ असले तरी तब्येतीने त्या ठणठणीत आहेत. त्यांना आतापर्यंत कोणताही आजार झाला नाही. आजही घरातील काय पण शेतीचीही अनेक कामे त्या करतात. जर आपली वाळू खाण्याची सवय सुटली तर मात्र आपण नक्कीच आजारी पडू अशी भिती त्या बोलून दाखतात. कर्नाटकातील रमाव्वा नावाच्या मुलीलाही अशीच विचित्र सवय आहे. ती फक्त आणि फक्त पार्लेजी बिस्किट खाऊन जगते. गेल्या अठरा वर्षांपासून तिच्या आहारात बदल करण्याचा घरच्यांनी प्रयत्न केला पण तिची सवय काही त्यांना बदलता आली नाही.