इस्लाममध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. रमजाननिमित्त पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहा हिने काही मुस्लिम दांभिकांवर फेसबुकच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवला आहे. तिच्या या वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे सोशल मीडियावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘काही मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा पवित्र महिना अल्लाहची, गरिबांची मनोभावे सेवा करून पुण्य कमावण्याचा असतो. पण काहींसाठी रमजान मात्र ‘इस्लामच बाजारीकरण’ आणि सच्चा मुस्लिम असल्याचा आव आणून दांभिकपणा करण्याचा असतो, असं वक्तव्य तिने केलं. याबद्दल तिने फेसबुक पोस्ट शेअर करून काही दांभिक मुस्लिमांवर कडाडून टीका केली. तर दुसरीकडे ही फेसबुक पोस्ट सगळ्याच मुस्लिमांसाठी नसून, जे फक्त रमजानच्या महिन्यात ‘सच्चा मुस्लिम’ असल्याचा आव आणतात त्यांच्यासाठीच आहे, असंही म्हणायला उस्ना विसरली नाही.

Viral Video : ऐकावे ते नवलच! जन्मत:च बाळ चालू लागले

‘रमजानचा महिना सुरू झाला की माझ्या ओळखीतले काही मुस्लिम शुभेच्छापत्र पाठवतात. पण त्याचा काय उपयोग? हे सारेच दांभिक आहेत. यात माझ्या ओळखीतल्या अनेक दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्रींचा समावेश आहे. हे लोक फक्त शुभेच्छा पाठवतात, पण आतून मात्र त्यांचं मन काळंच आहे. माझ्यासमोर माझ्याशी ते गोडगोड बोलतात. पण माझी पाठ फिरली की मात्र माझ्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात. इतरांनाही माझ्याबद्दल वाईट सांगतात. या शुभेच्छा पाठवणाऱ्यात असेही मुस्लिम आहेत ज्यांना आपल्या देशात काय चाललंय याची काहीच पडलेलं नसते. अल्पसंख्यक असो, गरीब असोत किंवा आणखी कोण त्यांच्यावर इथे जो अन्याय होतंय याचं तसूभरही घेणं देणं या लोकांना नाही. काही मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा महिना हा पवित्र असून अल्लाहची, गरिबांची मनोभावे सेवा करून पुण्य कमावण्याचा हा महिना असतो. पण काहींसाठी रमजान मात्र दिखावा करण्याचा पैसे कमावण्याचा आणि सच्चा मुस्लिम असल्याचा आव आणून दांभिकपणा करण्याचा महिना आहे. माझ्या ओळखीतल्या अशा कितीतरी महिला आहेत की ज्या रमजानमध्ये महागडी, उंची वस्त्रे परिधान करतात. चेहऱ्यावर अक्षरश: मेकअपचा थर थापतात पण असं करून काय फायदा आहे? तुमचं मनच कलुषित आहे आणि तुमच्या हाताखालच्या लोकांशी जर तुम्हाला दोन शब्द चांगले बोलता येत नसतील तर रमजानच्या शुभेच्छा पाठवण्यात काय अर्थ आहे?’ असे म्हणत तिने एकप्रकारे पाकिस्तानी फिल्म इंण्डस्ट्रीमधल्या अनेकांवर टीका केली.

Viral Video : पान खाये हाथी हमारो!

‘काही लोक रमजानच्या ३० दिवसांत फक्त आणि फक्त खोटा मान, पैसा कमावण्यासाठी धडपडतात, त्यांना रमजानच्या महिन्यात दिखावा करण्यात आनंद वाटतो. मी या महिन्यात उपवास करत नाही किंवा नमाजही पडत नाही पण असं न करून मी धर्माचा अपमान करतेय, असं मला अजिबात वाटत नाही. कोणताही दिखावा करण्यात आणि खोटा आदर दाखवण्यात मला रस नाही.’, असं म्हणत तिने आपल्या पोस्टचा शेवट केला. उस्नाच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी नेटिझन्सने मात्र तिच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केले.