एखाद्या कंपनीच्या सीईओंना तुम्ही भाषण करताना यापूर्वी अनेकदा पाहिले असेल. किती अदबीने आणि विचार करून ते भाषण देत असतात. आपल्या भाषणाने इतरांवर छाप पडली पाहिजे यांची काळजी ते पुरेपुर घेतात. पण सध्या मात्र पेटीएमच्या सीईओ विजय शेखर शर्मा यांचे भाषण मात्र यापेक्षाही वेगळे होते. हॉलीवूडमधल्या प्रसिद्ध चित्रपट ‘वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’मध्ये नायकाने जसे भाषण केले होते त्याच स्टाईलने सीईओंनी आपल्या तरूण कर्मचा-यांना वेडे करून सोडले. हे भाषण करताना सीईओ इतके उत्साहात होते की चक्क भाषणात शिव्यांचा वापर करण्यापासून शर्मांना राहावले नाही.

वाचा : ४८ तासांत दिल्लीत सैन्य पाठवण्याचा दावा करणाऱ्या चिनी सरकारी वाहिनीचे भारतीयांनी काढले वाभाडे

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पेटीएमची चांगलीच चांदी झाली. फक्त सहा दिवसांत पेटीएमचा व्यवहार तब्बल तीनशे पटींनी वाढला. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयाने या कंपनीला अच्छे दिन आले. आपले यश साजरे करण्यासाठी पेटीएमने नववर्षांची पार्टी ठेवली होती. अर्थात यशात सीईओंचा वाटाही मोठा, म्हणून आपल्या कर्मचा-यांना मार्गदर्शन करण्यासाठी सीईओ विजय शेखर शर्मा स्टेजवर आले आणि आपल्या अनपेक्षित आणि हटके स्टाईलने त्यांनी स्टेजवर आग लावली. ‘जो आपल्यासोबत नसेल त्याच्यावर रडण्याची वेळ येईल, जे १० वर्षांत करणे शक्य नव्हते ते आपण एका वर्षात करून दाखवले. २०१७ हे वर्ष पण पेटीएमचेच असेल’ असे शर्मा ओरडून ओरडून सांगत होते. एवढंच नाही तर आम्ही जो विचार केला त्या विचाराने स्पर्धकांची पँट ओली झाली नाही तर काय फायदा? हे साले आपल्याला रोखत होते’ आणि इतरही शिव्या देत त्यांनी आपले भाषण सुरू ठेवले. आता सीईओंच्या या भाषणावर पेटीएमच्या कर्मचा-यांनी टाळ्या वाजवल्या असल्या तरी सोशल मीडियावर मात्र अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

सीईओंचा पार्टीमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे पडसाद पाहायला मिळाले. त्यामुळे सकाळपासूनच ट्विटरवर #सड़कछाप_PayTM हॅशटॅग ट्रेंड होत होता. अनेकांनी नाराजीच्या कमेंट करत यावर आपला आक्षेप नोंदवला.