तमाम सिनेमावेड्या रसिकांना गेल्या दोन वर्षांपासून छळणाऱ्या ‘कटप्पाने बाहुबलीको क्यो मारा?’ या प्रश्नाचे उत्तर आज समजले आहे. आता कोणत्याही चित्रपटाबद्दल एवढी उत्सकुता नसेल तेवढी उत्सुकता या चित्रपटाबद्दल आणि बाहुबलीला का मारलं याच्या उत्तराबद्दल अनेकांना आहे. तसं एव्हाना हुशार लोकांना या प्रश्नाचं उत्तर कळलंही असेल म्हणा. पण प्रत्यक्षात जाऊन हा चित्रपट पाहण्याची मज्जा काही औरचं! तेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सगळीकडे फक्त आणि फक्त बाहुबलीची हवा पाहायला मिळते आहे. ही हवा इतकी की ‘बाहुबली २’ चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी तब्बल साडेतीन ते चार हजार रुपये मोजून याची तिकिटे विकत घेतली आहेत.

आतापर्यंत एवढे जास्त पैसे क्वचितच हल्ली प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी मोजले असतील. तेव्हा आता महागडी तिकिटे विक्रीचा विक्रमही बाहुबली-२ च्या नावे जमा झाला आहे. हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी तर तिकिटांसाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. तिकिटांची विक्री तर एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आहे की काहींनी तर साडेतीन चार हजार रुपये मोजून तिकिटे विकत घेतल्या आहेत. पुढचे काही दिवस थिएटर ‘हाऊसफुल्ल’ आहेत तेव्हा सकाळी सकाळी ४ चा शो ठेवा अशाही मागण्या अनेक ठिकाणी होत आहे.

हैदराबादमध्ये तर गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासूनच बाहुबली २ च्या तिकिटांसाठी प्रेक्षकांनी रांगा लावल्या होत्या. ही रांग ३ किलोमीटर एवढी मोठी होती. तेव्हा या चित्रपटाची किती हवा आहे हे वेगळं सांगायला नको. हे तर सोडाच कालपासून तर ट्विटरवर खास रजेचा अर्जही फिरत होता. बाहुबली पाहण्यासाठी सुट्टी हवीय तर बॉसला काय कारणं सांगावी याची विस्तृत कारणं दिलेला अर्जच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.