आज महाराष्ट्रात दिवाळीचा पाडवा साजरा होतो आहे. यादिवशी देशातल्या इतर राज्यांत गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा पराभव करुन गोवर्धनची पूजा केली अशी मान्यता आहे म्हणून शेणापासून प्रतिकात्मक पर्वत तयार करून त्याची पूजा केली जाते. मात्र मध्य प्रदेशमधल्या बैतुल येथे यादिवशी एक वेगळीच परंपरा आहे. यादिवशी छोट्या मुलांना शेणात लोळवले जाते. असे केल्याने मुलांचे रोगराईपासून संरक्षण होते, अशी या लोकांची मान्यता आहे त्यामुळे मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध शेणात झोपवले किंवा लोळवले जाते.

जाणून घ्या, मोदींच्या आईच्या नावानं फिरणाऱ्या व्हिडिओमागील सत्य

बैतुल गावात गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. यादिवशी गायीच्या शेणाचा डोंगर तयार करून त्यावर झेंडूची फुले वाहिली जातात, त्यानंतर छोट्या मुलांना त्यात झोपवलं किंवा लोळवले जाते. यात अगदी काही महिन्यांच्या बाळांचादेखील समावेश असतो. सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत ही प्रथा सुरू असते. अनेक मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध शेणात ढकललं जातं. पालकही अनेकदा त्यांच्यावर बळजबरी करताना दिसून येत आहे, म्हणून अनेकांनी या प्रथेवर आक्षेप घेतला आहे. स्थानिकांच्या मते लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि रोगराईपासून त्यांचा बचाव करण्यासाठी ही प्रथा सुरू केली आहे. पण ही प्रथा पूर्णपणे चुकीची असून त्यावर बंदी घालावी अशीही मागणी होत आहे.