एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूमध्ये शोककळा पसरली आहे. ‘अम्मा’चे निधन झाल्याने त्यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले आहेत. अशावेळी अनेकांनी अम्मांच्या सोबत घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे. चित्रपटसृष्टी ते राजकारण असा त्यांच्या प्रवास होता. त्यानिमित्ताने त्यांचे काही दुर्मिळ फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळाले. यात जयललिता यांचा १९५० सालचा शाळेतील फोटोही समोर आला आहे.

चेन्नईत स्थायिक होण्यापूर्वी त्या बंगरुळूमधल्या ‘बिशप कॉटन गर्ल्स स्कूल’मध्ये शिकत होत्या. इयत्ता चौथीत असतानाचा त्यांचा हा फोटो आहे. ‘जिच्या डोळ्यात चमक आहे’ अशी मुलगी या नावाने सगळ्याच मुली त्यांना ओळखायच्या. त्यानंतर ही शाळा सोडून त्या चेन्नईत स्थायिक झाल्या. पण त्यांच्या वर्गमैत्रिणीच्या लक्षात मात्र त्याच डोळ्यात चमक असलेल्या जयललिता आहेत. या शाळेतील त्यांची वर्गमैत्रिण फातिमा जाफर ही याच शाळेत पुढे शिक्षिका होती. त्या दरवर्षी शाळेत जयललिता यांच्या वाढदिवसाला मिठाई वाटत असत. २००७ मध्ये शाळेतून निवृत्ती घेईपर्यंत त्या न चुकता मिठाई वाटत. जाफर यांच्याकडे हा जुना फोटो होता. पुढे शाळेच्या स्मरणिकेमध्येही हा फोटो वापरण्यात आला.