मध्य प्रदेशमधल्या बुंदेलखंड गावातील गावकऱ्यांनी पहिल्यांदाच आपल्या गावात दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्याचे निश्चित केले. पण पौरोहित्य करण्यासाठी एकही पुरोहित गावात उपस्थित नव्हता, शेवटी देवीची पूजाविधी करणार कोण? असा यक्षप्रश्न गावकऱ्यांसमोर होता. तेव्हा या गावातील महिला पोलीस अधिकाऱ्याने स्वत: पौरोहित्याचे संपूर्ण  विधी पार पाडले.

अंजली उडेनिया असं या महिला पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे. गावात दलितांची वस्ती अधिक आहे म्हणूनच देवीची पूजा करण्यासाठी पुरोहितांनी येण्यास नकार दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. पण गावकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन अंजली त्यांच्या मदतीला धावून गेल्या. मंडपात पोहोचल्यानंतर त्यांनी सारी सूत्रे हातात घेतली आणि दुर्गामातेची पूजा केल्याची माहिती ‘एनडीटीव्ही इंडिया’ने दिली आहे.

वाचा : तुम्हीसुद्धा प्रेमात आहात? मग ही जय आणि सुनिताची प्रेमकहाणी नक्की वाचा…

दलित असल्याने गावातील पुरोहितांनी आपल्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असला तरी पुरोहितांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला. आपण दुसरीकडे पूजाविधी करायला गेलो असल्याने तिथे पोहोचायला उशीर झाल्याचं पुरोहितांनी सांगितलं. दरम्यान कोणाचंही मन दुखावू नये, म्हणून कायद्याचं रक्षण करणाऱ्या ‘दुर्गे’ने केलेल्या पूजेचं सगळेच कौतुक करत आहेत.