गावात बिबट्या किंवा सिंहांसारखे हिंस्त्र श्वापदे शिरली की गावकऱ्यांचा जीव टांगणीला लागतो. कधी कधी हे प्राणी माणसांची शिकार करतात तर कधी गुरांची शिकार करून गावकऱ्यांचे मोठे नुकसान करतात. तेव्हा जंगलाशेजारी राहणाऱ्या गावांत नेहमीच माणूस आणि प्राणी असा संघर्ष पाहायला मिळतो. कधी कधी तर या संघर्षात माणूस या हिंस्त्र प्राण्यांपेक्षाही अधिक क्रूर होतो. जंगलाच्या हद्दीत राहाणाऱ्या गावकऱ्यांसाठी प्राण्यांसोबत होणारे संघर्ष नित्याचे झाले आहेत. ओडिशातल्या कुरुली इथल्या गावकऱ्यांना देखील आता या प्राण्यांच्या दहशतीत राहण्याची सवय झाली आहे. दोन दिवसांपूर्वी याच गावात बिबट्या शिरला होता. त्याला पकडण्यासाठी वन अधिकांऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. १२ तासांहून अधिक काळ या बिबट्याला पकडण्याचे वन अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. पण या खेळात एका वनधिकाऱ्याचे प्राण थोडक्यात वाचले.

गावात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनाधिकारी प्रयत्न करत होते. जीव मुठीत घेऊन गावकरीही हा खेळ बघण्यासाठी येथे जमले होते. बिबट्याला पकडण्यासाठी एक वनाधिकारी घराच्या छपरावर चढून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचे लक्ष नसताना बिबट्याने मागून येऊन त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. इकडे आड तर तिकडे विहिर अशी या अधिकाऱ्याची गत झाली होती. शेवटी बिबट्याची शिकार होण्यापेक्षा त्याने छतावरून खाली उडी मारण्याचा पर्याय स्विकारला. यात हा अधिकारी गंभीर जखमी झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अधिकाऱ्याने उडी मारल्याबरोबर बिबट्यानेही त्याच्यावर झेप घेत खाली उडी मारली. पण खाली जमलेली गर्दी पाहून बिबट्या गांगरून गेला. आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. शेवटी बारा तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याची गावातील दहशत संपली आणि त्याला पकडण्यात गावकऱ्यांना यश आले.