काही दिवसांपूर्वी दिल्लीत घडलेली घटना सगळ्यांनी वाचली असेल. अपघात झाल्यानंतर एक तरूण १२ तास रस्त्यावर पडून होता, त्याला मदत करणं तर दुरच राहिलं पण अशाही अवस्थेत चोरांनी चांगलाच हात साफ करून त्याचा मोबाईल आणि पैसे पळवले होते. अशा अनेक बातम्या वाचून ‘माणुसकी’, ‘प्रामाणिकपणा’ हे शब्दच माणसांच्या आयुष्यातून हरवले की काय असं वाटू लागतं, पण काही लोक असे आहेत ज्यांच्यामुळे आजही माणुसकी जिवंत आहे, म्हणूनच असे लोक कौतुकास पात्र ठरतात.

अवघ्या १५ वर्षांच्या विशाल उपाध्याय याने आपल्या कृतीतून जगात अजूनही थोडी का होईना, पण माणुसकी व प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे दाखवून दिले. विशालला काही दिवसांपूर्वी खेळताना हिऱ्याचे पाकीट सापडले होते. बाजारपेठेत या हिऱ्यांची किंमत साधारण ४० लाख इतकी होती. घरात अठराविश्व दारिद्य्र असलेल्या विशालने हे हिरे परस्पर विकले असते तर तो कदाचित लखपती होऊ शकला असता. मात्र, त्याने तसे न करता प्रामाणिकपणे हे हिरे मालकाला परत केले.

गुजरातमधले हिरा व्यापारी मनसुख सवालिया यांचं हिऱ्यांचं पाकिट हरवलं होतं. त्यांनी या हिऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही हिरे सापडले नाही. त्याचदिवशी विशाल आपल्या मित्रांसोबत मैदानात खेळत होता. खेळताना त्याचा चेंडू पार्किंग लॉटमध्ये गेला. चेंडू शोधण्यासाठी तो पार्किंग लॉटमध्ये गेला असता त्याला दुचाकीच्याजवळ पडलेलं हिऱ्यांचं एक पाकिट दिसलं. विशालने हे पाकिट पाहिलं असता त्याला यात हिरे दिसले. विशालने हे पाकिट उचललं आणि घरी आणलं जेव्हा याचा मालक येईल तेव्हा त्याला ते परत करण्याचं त्यानं ठरवलं.

गेल्या आठवड्यात ही घटना घडली. जेव्हा मनसुख हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात भटकत होते तेव्हा विशालच्या कानावर ही गोष्ट पडली. त्याने लगेचच मनुसख यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचे हिरे त्यांना परत केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या माहितीनुसार विशालची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. त्याचे बाबा सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करतात त्यांना दरमहा आठ हजार पगार मिळतो. तर आई शिवणकाम करून घरखर्चाला हातभार लावते. विशालचा प्रामाणिकपणा पाहून मनसुख यांनी ३० हजारांची रोख रक्कम बक्षीस म्हणून विशालला दिलीय, तर ‘सुरत डायमंड असोसिएशन’तर्फे त्याला ११ हजारांची रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आलीय.