सरकारी योजनेच्या नावाखाली गरिबांचे घर प्रकाशमय करण्याची विद्युत वितरण कंपनीची योजना गरिबांना लुटणारी असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी मोखाड तालुक्यात कुपोषणामुळे बळी पडलेल्या सागर वाघ या बालकाच्या कुटुंबियांना वीज कंपनीने चक्क चार हजार ७२० रूपये वीजबिल पाठवले. या बिलामुळे गावकरी चक्रावून गेले आहेत. मीटरची मागणी नसताना कंपनीने केवळ सरकारची योजना पुढे करून विजेची जोडणी देऊन अवाच्या सव्वा वीजबिल पाठवल्याने या कुटुंबियांवर ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

एकीकडे वाघ कुटुंबीय हलाकीचे जीवन जगत असतानाच दुसरीकडे या बिलामुळे त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. गेल्या वर्षी मोखाडा तालुक्यात कळमवाडी येथील सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याने पालघर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर राज्यातील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी जव्हार, वाडा मोखाडा तालुक्यातील बळी ठरलेल्या कुटुंबाची भेट घेतली. या दरम्यान वाघ कुटुंबीयांची ही भेट घेतली.

यावेळी दिलेल्या एकही आश्वासनांची अद्याप पूर्तता झाली नाही. मात्र, सरकारला दाखविण्यासाठी तसेच वाघ कुटुंबाची मागणी नसताना त्यांना वीज कंपनीने वीज जोडणी दिली. त्यातच सदरच हे बिल समोर आले आहे. आमचे दोन वेळच्या जेवणाचे हाल असताना बिल कोठून भरणार हा प्रश्न वाघ कुटुंबियांना सतावत आहे.

सागर वाघ याच्या कुटुंबाने घरात वीज जोडणी करण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नव्हता. वाघ कुटुंबियांना न विचारता त्यांच्या घरामध्ये विजेचे मीटर बसवून वीज जोडणी देण्यात आली. या वीज जोडणीचे पैसे महावितरण कंपनीनेच भरले. मग त्यांना दर महिन्याचे बिल देण्यात आले त्यांची पैसे भरण्याची ऐपत नसताना त्यांनी मोलमजुरी करून काही महिने बिल भरले. घरात फक्त एक ‘एलईडी’ बल्ब सोडला तर बाकी कोणतेच विजेवर चालणारे उपकरण नाही. तरीपण त्यांना महिना अंदाजे ३०० रुपये बिल दिले जात होते. मात्र, महावितरण कंपनीने त्यांना चार हजाराचे बिल देऊन फार मोठा झटका दिला आहे. एवढी मोठी रक्कम भरणे अशक्य असल्यामुळे वाघ कटुंबियांनी मीटर काढून न्यावे, असे म्हटले आहे.