उत्तर प्रदेशमधल्या कानपूर येथे पोलिसांना बेदम मारहाण करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बलात्काराची घटना घडल्यानंतर इथले रुग्णालय सील करण्याची मागणी जमावाने केली होती. यावेळी जमाव आक्रमक झाला. जमावाला थोपवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले, पण हिंसक जमावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. यावेळी जे पोलीस जमावाच्या हाती लागले त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान कायद्याच्या रक्षकांना अशी मारहाण करतानाचे दृश्य पाहून सोशल मीडियावर या घटनेच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान काय योग्य आणि काय अयोग्य असा प्रश्न आता लोकांना पडला आहे.

वाचा : कशा कमावतात ‘या’ कंपन्या अब्जावधी रुपये?

कानपूरमध्ये एका १६ वर्षांच्या मुलीचा बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आलीय. जागृती रुग्णालयातल्या वॉर्ड बॉयनेच तिच्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी आणि काही लोकांनी रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केलं. हे रुग्णालय पूर्णपणे सील करण्यात यावं अशी जमावाची मागणी होती. पण ही मागणी पूर्ण होण्याची कोणतीही चिन्हे न दिसल्याने जमाव अधिकाअधिक संतप्त झाला. तेव्हा जमावाला थोपवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमाव अधिक आक्रमक होऊन त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केली. यात तीन पोलीस गंभीररित्या जखमी झालेत. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी जमावाच्या तावडीत सापडला तेव्हा जमावाने लाथा बुक्क्याने त्याला मारहाण केली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेव्हा कायदा हातात घेऊन कायद्याच्या रक्षकांवर हात उगारणाऱ्या जमावावार कारावाई करण्याची मागणी होत आहे.

वाचा : चुकून पाठवलेले व्हॉट्सअॅप मेसेज लवकरच करता येणार अनसेंड