शहरी नागरिकांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा माणूस म्हणजे रिक्षावाला. सकाळी आॅफिसला जायची घाई असो की काही इमर्जन्सी असो, सगळ्यात आधी मदतीला येणारा माणूस म्हणजे रिक्षावालाच. शहराशहरांनुसार वाहनं बदलली तरी या माणसांचं महत्त्व कमी कधीच होत नाही. मग ती मुंबईतली टॅक्सी असेल किंवा मग कोलकात्यातली सायकल रिक्षा.

आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने रोजच्या रोज असंख्य माणसांना भेटणाऱ्या या रिक्षावाल्यांकडे नाही म्हटलं तरी असंख्य अनुभव गाठीला जमतात. कुठलं गिऱ्हाईक वाद घालतं, कुठलं प्रेमाने वागतं, कधी अडीअडचणीला कोणी धावून येतं तर कधी फक्त दोन मिनिटांच्या गप्पांनी त्या रिक्षावाल्याच्या मनातला दिवसभरातला ताण कमी करतं.

अमृतसरमधल्या एका हातरिक्षा चालकाने आपले या सगळ्या अनुभवांवर एक पुस्तक लिहिलंय. ४० वर्षांच्या राजबीर सिंग या रिक्षाचालकाने पंजाबी भाषेत हे पुस्तक लिहिलंय. ‘रिक्षा ते चल्दी जिंदगी’ (रिक्षातलं जीवन) या नावाच्या आपल्या या पुस्तकात राजबीर यांनी गेली वीस वर्षं त्यांना आलेले अनुभव सांगितले आहेत.

त्यांच्या वडिलांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे राजबीर सिंग यांना वयाच्या विसाव्या वर्षीच रिक्षा चालवायला सुरूवात केली.

आपल्याकडे शीख समाजाचं चित्रण मुख्यत: सिनेमातून आपल्यासमोर येतं. चकचकीत दुनियेत वावरणाऱ्या या लोकांना पाहून पंजाबमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं आपल्याला वाटतं पण तिथे दारिद्र्यरेषेच्या खाली असणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. शीख समाजामध्ये दलित समाजाचंही प्रमाण मोठं आहे.

स्वत: गरिबीचा सामना करावा लागलेल्या राजबीर सिंग यांना या सगळ्यांसाठी काही करावं असंही आधीपासून वाटत होतं. स्वत: गरीब असूनही त्यांनी अनेकदा अनेक गिऱ्हाईकांना पैसे न घेता त्यांच्या इच्छित स्थळी पोचवलंय. हे असे सगळे अनुभव त्यांनी त्यांच्या या पुस्तकात लिहिले आहेत.

अमृतसरमध्ये एक भागात पोलिओमुळे पाय अधू झालेली एक मुलगी रोज लंगडत आपल्या आॅफिसमध्ये जायची. या मुलीची ही धडपड राजबीर सिंग रोज पहायचे. एका दिवशी ते स्वत: त्या मुलीकडे गेले आणि तिला त्यांच्या रिक्षात बसण्याची विनंती केली. त्यावर तिने आपण पैसे वाचवण्यासाठी रोज चालत जात असल्याचं सांगत रिक्षात बसायला नकार दिला. पण ‘मी तुझ्याकडून कोणतेही पैसे घेणार नाही’ असं सांगत राजबीरनी त्या मुलीला तिच्या आॅफिसपर्यंत पोचवलं. पुढे कितीतरी महिने राजबीर सिंग त्यांच्या रिक्षातून या मुलीला मोफत आॅफिसमध्ये पोचवायचे.

असे अनेक चांगले-वाईट अनुभव त्यांनी त्यांच्या या पुस्तकात लिहिले आहेत. शहरातल्या रोजच्या वाहत्या वातावरणात व्यवसाय करताना एका त्रयस्थाच्या नजरेतून त्यांनी हे सगळे अनुभव मांडले आहेत.