आपल्या समाजात पुरूषाला बहुतांशी झुकतं माप मिळतं. जन्मापासून सुरू होणारी ही गोष्ट स्त्रियांसाठी जीवनभर तिच्या मार्गात अडथळे निर्माण करते. जन्माला येण्याचं भाग्य तिला लाभलंच तर लहानपणापासून होणारी हेळसांड भावांच्या तुलनेत कमी मिळणारा आहार, शिक्षण अशा अनेक बाबींना झगडून तिला पुढे यावं लागतं.
पण आता काळ बदलतोय. पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना समान स्थान मिळावं असा विचार मोठ्या प्रमाणावर पुढे येतो आहे. समाजात जागृती निर्माण होते आहे.

राजस्थानमधल्या एका आगळ्यावेगळ्या लग्नामुळे हीच बाब आता समोर येते आहे. इथल्या अलवार जिल्ह्यामध्ये एक नवरीने आपल्या लग्नाची वरात स्वत:च तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे नेली. वास्तविक पाहता परंपरेनुसार नवरामुलगा त्याची वरात घेऊन नवऱ्यामुलीच्या घरी जातो आणि या वरातीचं स्वागत मुलीकडचे करतात. पण २५ वर्षांच्या जिया शर्मा आणि तिच्या कुटुंबीयांनी तिची वरात तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे नेली. राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात झालेलं हे लग्न सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलं होतं. जिय़ा शर्मा आपल्या लग्नाच्या वरातीमध्ये घोड्यावर ऐटीत बसली होती आणि तिच्या वरातीमध्ये तिचे मित्रमैत्रिणी मस्त नाचत होते. राजस्थान हे तसं पारंपरिक विचारसरणीचं राज्य आहे. त्यामुळे तिथे एका मुलीने तिच्या लग्नाची वरात स्वत: नवऱ्यामुलाच्या घरी नेणं ही एक खूपच मोठी बाब आहे. राजस्थानमध्ये महिला नेहमी डोक्यावरून तसंच चेहऱ्यावरून पदर घेतात. अशा वेळेला एका लग्नाच्या वरातीत मुली नाचत आहेत हीसुद्धा काहीशी नवलाची बाब आहे.

समाजात जुन्या चालीरीती मोडून नवे पायंडे पाडायचे असतील तर त्यासाठी समाजाचं सहकार्यही मिळण आवश्यक असतं जिया शर्माच्या बाबतीत तिच्या नवऱ्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं पूर्ण सहकार्य जियाला मिळालं. जियाच्या वरातीचं मुलाकडच्यांनी प्रेमाने स्वागत केलं