कधी कधी आपल्याला निसर्गात फार वेगळं काहीतरी पाहायला मिळतं. अशीच एक धक्कादायक आणि दुर्मिळ घटना पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये पाहायला मिळाली. इथल्या शेतात नागाने चक्क नागाला गिळल्याचं पाहायला मिळलं. नागाला गिळून हा नाग शेतात निपचित पडून होता. नेहमी दिसणाऱ्या नागापेक्षा या नागाची हालचाल वेगळीच होती हे सर्पमित्र रशिदच्या लक्षात आलं. कदाचित त्याने सवयीपेक्षा नक्कीच वेगळी शिकार केली असणार असं रशिद यांना वाटलं. त्याने काठीच्या मदतीने नागाला गिळलेली शिकार बाहेर काढायला भाग पाडलं. तेव्हा काही वेळात त्यांनी जे काही पाहिलं ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण या नागाने आपल्याएवढ्याच आकाराचा नाग गिळला होता.

चांदोली रोड लोंढे माळा गावात उत्तम लोंढे यांचे शेत आहे. या शेतात त्यांच्या कुटुंबियांना पाच सहा फुटांचा मोठा नाग निपचित पडलेला दिसला. याची माहिती त्यांनी तातडीने सर्पमित्र रशिद यांना दिली. याने नक्कीच चुकीचा पदार्थ किंवा प्राणी गिळला असेल याची रशिदला खात्री पटली आणि काठीचा वापर करून त्याने नागाला गिळलेला पदार्थ बाहेर काढायला भाग पाडलं. यानंतर काहीवेळातच त्याने आपल्या आकाराचा गिळलेला नाग बाहेर काढला. पोटातून नाग बाहेर आल्यानंतर हा नाग व्यवस्थित हालचाल करू लागला. रशिद यांनी या सापाला नंतर सुखरूप जंगलात सोडून दिलं. ही दुर्मिळ घटना इथल्या नागरिकांनी आपल्या कॅमेरात कैद केली आहे.

ही गोष्ट आपल्यासाठी दुर्मिळ असली तरी अनेकदा साप सापाला गिळतात असे सर्पतज्ज्ञ निलमकुमार खैरे लोकसत्ता ऑनलाइनशी संवाद साधताना म्हणाले. भूक लागली की समोर जी शिकर दिसेल त्यावर साप तुटून पडतात. अशावेळी समोर आपल्याच प्रजातीचा साप आला तरी ते त्याची शिकार करतात अशी माहिती त्यांनी दिली. फक्त विषारीच नाही तर बिनविषारी साप देखील इतर सापांची शिकार करतात. मात्र एका सापाने दुसऱ्या सापाला गिळलं की ते खाद्य मात्र त्याला पचायला काही अवधी लागतो असंही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातला असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. यात एक सापाने चक्क अजगराला गिळलं होतं.