स्टीव्ह अर्व्हिन हे नाव अजूनही आपल्या लक्षात असेल, नाव जरी लक्षात नसलं तरी चेहरा मात्र नक्कीच अनेकांना आठवत असेल. ऑस्ट्रेलियन वाईल्ड लाईफकिपर अशी त्याची ओळख. अगदी बिंधास्त एखाद्या जंगली प्राण्याच्या जवळ जायचं आणि त्याच्याबद्दल माहिती सांगायची ही स्टीव्हिची शैली. मग ती मगर असो की माणसांना अख्ख गिळणारा अजगर हे जणू आपले मित्रच आहेत अशाच थाटात स्टीव्ह या प्राण्यांना वागवायचा, त्यामुळे स्टीव्हचा कार्यक्रम पाहताना भितीही वाटायची आणि त्याच्याबद्दल कौतुकही. एकटा माणूस कसे काय एवढं साहस करू शकतो असा प्रश्न त्याला पाहताना अनेकदा आपल्याला पडला असेल. स्टींग रेच्या डंखाने २००६ मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर स्टीव्हची कमी नेहमीच सलत राहिली. पण आता त्याची ही कमी भरून काढण्यासाठी त्याचा मुलगा सज्ज झाला आहे.

एका छोट्या इगुना सोबत खेळताना खूप वर्षांपूर्वी स्टीव्हने आपल्या मुलाचा फोटो टाकला होता. स्टीव्ह यांच्या मृत्यूनंतर कदाचित पहिल्यांदाच त्याचा मुलगा रॉबिन समोर येत आहे. स्टीव्हच्या दोन्ही मुलांनी याच क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. रॉबिन फक्त १३ वर्षांचा आहे पण वडिलांसारखाच तो अगदी बिंधास्त या प्राण्यांशी गट्टी जमवतो. त्याला बघून हा तर स्टीव्ह सारखाच आहे अशी प्रतिक्रियाच येते. मोठं होऊन हा वडिलांसाराखाच होणार अशाही प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. स्टीव्हच्या मुलीने आपल्या भावाचा आणि वडिलांचा फोटो देखील ट्विटरवर शेअर केला आहे त्यामुळे स्टीव्हचे चाहते आता रॉबिनला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.