सध्या ‘सराहा’ अॅपनं सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे. जो तो हे अॅप डाऊनलोड करतो आहे. या अॅपची क्रेझच तशी आहे म्हणा. इतर अॅपपेक्षा काहीतरी हटके देण्याचा सराहाचा प्रयत्न असल्यानं अनेकांना हे अॅप खूपच आवडलं आहे. या अॅपमध्ये तुमच्या ओळखीची व्यक्ती तुम्हाला मेसेज करू शकते. आतापर्यंत जी गोष्ट त्या व्यक्तीच्या तोंडावर आपण बोलू शकत नाही ती सराहाच्यामाध्यमातून पोहोचवणं सोप्पं झालं. अर्थात यात सेंडरचं नाव मात्र गुप्त ठेवण्यात आलं, याच यूएसपीमुळे हे अॅप तरुणांमध्ये तुफान प्रसिद्ध होत आहे. आठवड्याभरातच हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या १ कोटींच्या घरात पोहोचली. हे अॅप जितक्या वेगानं प्रसिद्ध होत आहे तितक्याच वेगानं याबद्दल काही अफवाही पसरत आहेत. ती अशी की ‘सराहा एक्सपोज्ड’ sarahahexposed या वेबसाईटवर क्लिक केल्यास तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव जाणून घेता येणार आहे. आपल्याला निनावी मेसेज पाठणाऱ्याबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांना असतं आणि याच कुतूहलापायी अनेकांनी या वेबसाईटला भेटही दिली, पण ही केवळ फसवेगिरी आहे हे अनेकांच्या नंतर लक्षात आलं.

तेव्हा तुम्हालाही अशा कोणत्याही लिंक येत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. ‘sarahahexposed’ या वेबसाईटवर निनावी मेसेज करणाऱ्यांची माहिती उघड होते, असे म्हटले जाते. त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी अनेकजण या वेबसाईटला भेट देतात. माहिती जाणून घेण्यासाठी यूजर्स तिथे दिलेल्या एक एक प्रक्रिया पूर्ण करतात. पण शेवटपर्यंत हाती काहीच लागत नाही. तेव्हा ही फेक वेबसाईट असून फक्त क्लिक मिळवण्यासाठी यात युजर्सची दिशाभूल करण्यात आली आहे, असे ‘फर्स्ट पोस्ट’नं दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मुळात सराहाच्या धोरणानुसार हे अॅप कोणत्याही सेंडरची माहिती उघड करत नाही. सेंडरची गुप्तता हे अॅप पाळतं. तेव्हा सेंडरचं नाव उघड करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे या सगळ्या केवळ अफवा आहेत.

‘सराहा’ अॅपविषयी थोडक्यात
सराहा हे अॅप सौदीमधल्या तीन तरूणांनी मिळून तयार केलं आहे. सध्या १ कोटी यूजर्सने हे अॅप डाऊनलोड केलंय. आयओएस आणि गूगल प्लेवर हे अॅप उपलब्ध आहे. २९ वर्षीय जेन अल-अबीदीन तौफीक आणि त्याच्या मित्रानं हे अॅप तयार केलं होतं. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकता. तुमच्या मनातलं बोलू शकता. प्रामाणिकपणे त्यांच्याविषयी मत मांडू शकता अर्थात तुमचं नाव मात्र शेवटपर्यंत त्या व्यक्तीला समजणार नाही. कारण या अॅपमधले मेसेज निनावी त्याच्या इनबॉक्समध्ये जमा होतील. पण मेसेज करणाऱ्या व्यक्तीला मात्र तुम्ही रिप्लाय देऊ शकत नाही. सध्या भारतासह अमेरिका, फ्रान्स, इंग्लड अशा तीसहून अधिक देशात हे अॅप उपलब्ध आहे.