इंटरनेटवर व्हिडिओ चॅटिंगचा पर्याय उपलब्ध करून देणा-या अनेक बेवसाईट्स आहेत. यावर ब-याचदा अनोळखी व्यक्तींना त्यातूनही मुलींना अॅड करून व्हिडिओ चॅट करण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. याच मोहापायी १९ वर्षांच्या मुलाला चक्क तुरुंगवास घडला. मुळचा सौदी अरेबियाचा असलेला अबु सिन हा मुलगा सौदीतल्या तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे. दात पडलेला, कुरळ्या केसांचा अबु एका सुंदर अमेरिकन तरुणीसोबत व्हिडिओ चॅटिंग करायचा. त्यांच्या या व्हिडिओ चॅट सौदीत खुपच व्हायरल झाल्यात त्यानंतर त्याच्यावर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवण्यात आला. गैरवर्तणुक करत शरिया कायदा मोडल्यामुळे त्याला सौदी पोलिसांनी अटक केली.
‘युनाव्ह’ ही लाईव्ह ब्रॉडकास्टींग वेबसाईट आखाती देशांतील तरुणामध्ये भलतीच प्रसिद्ध आहे. याच वेबसाईटवर एका २१ वर्षांच्या अमेरिकन तरुणीशी तो गप्पा मारायचा. सिनला इंग्रजी बोलता येत नाही अन् त्या तरुणीला अरबी भाषा समजत नाही त्यामुळे या दोघांचे गंमतीदार संवाद अनेकांनी लाईव्ह पाहिले. या दोघांच्या व्हिडिओ चॅटला साईट्वर फार व्ह्युज आहेत. एका व्हिडिओ चॅटमध्ये सिनने या मुलीला आय लव्ह यू म्हणण्याचा प्रयत्न केला. या लाईव्ह व्हिडिओखाली कमेंट करत अनेक सौदी नागरिकांनी त्यांना पकडून शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून तरुंगात टाकले. याप्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे. या चॅटसाठी त्याला १ ते ३ वर्षांचा तरुंगवास देखील होऊ शकतो. सौदी अरेबियात शिरिया कायदा कडक आहे. समाजात वावरतानाच काय पण इंटरनेटसाठीही येथे शिरिया कायदा लागू आहे.