तुम्हाला अलोम बोगरा आठतोय का? अहो तोच बांगलादेशी ‘सुपरस्टार’. आता त्याला मध्येच आठवण्याचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अलोम बोगरा या ट्विटर अकाऊंटवर मंगळवारी संध्याकाळी एक ट्विट करण्यात आलाय. ज्यात त्याचा आणि शाहारूख खानसोबत फोटो शेअर करण्यात आलाय. आता शाहारूखसोबत फोटो शेअर केलाय म्हणजे त्यात काय मोठी गोष्ट आहे, शाहारूखसोबत फोटो काढण्याची संधी ज्याला मिळते तो फोटो काढून शेअर करतोच, शेवटी शाहारूख सूपरस्टर आहे म्हणा. पण अलोमने जो फोटो शेअर केलाय त्यामुळे चाहत्यांनी त्याला शालजोडीतून हाणली आहे.

“शाहारूख माझा फॅन आहे आणि तो माझ्यासोबत सेल्फी घेत आहे. हा फॅन मला खूपच आवडला’ असं ट्विट अलोम बोगरा या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलंय आणि त्यासोबत शाहारूख खानसोबत सेल्फीही जोडला आहे. आता त्याने भलेही बांगलादेशी चाहत्यांना मूर्ख बनवले असेल तरी भारतीय चाहत्यांच्या सजग नजरेतून हा प्रकार काही सुटला नाही. तेव्हा काही मिनिटांत भारतीय नेटीझन्सने या फोटोमागचा खोटारडेपणा उघडा पाडला. अलोमच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेला फोटो हा मॉर्फ केलेला फोटो असून तो फार जूना आहे. एडिट करून यात अमोलचा फोटो बसवला गेलाय. तेव्हा या ट्विटवर नकारात्मक प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत.

 

अलोम बोगरा हा बांगलादेशमधला प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आहे. अनेक जुन्या गाण्यांचे व्हिडिओ बांगला भाषेमध्ये रेकॉर्ड करून तो व्हिडिओ बनवतो. हे व्हिडिओ युट्यूबवर आणि सोशल मीडियावर अपलोड केले जातात. हे व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच हिट होतात. त्यामुळे अलोमचे चाहते लाखो आहेत. मुली त्याच्यासोबत एक सेल्फी काढण्यासाठी तासन् तास रांगेत उभ्या राहतात. असे त्याच्याबद्दल अनेक किस्से ऐकिवात आहेत. अलोम बोगरा याचे बालपण गरिबीत केले. त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यामुळे शाळा सोडून अलोम हा सीडी आणि कॅसेट्स विकायचा. यातून त्याला महिन्याला तुटपुंजी रक्कम मिळायची. २००८ मध्ये पहिल्यांदा त्याने आपला म्युझिक व्हिडिओ बनवला आणि तो चालवत असलेल्या केबल नेटवर्कवर प्रसिद्ध केला. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ युट्यूबवरही अपलोड केला, तेव्हापासून अलोम हा खूपच प्रसिद्ध होत गेला.